आषाढी निमित्ताने खुले करण्याची ठाणे भाजपाची मागणी
ठाणे महापालिकेने उभारलेले वारकरी भवन हे गेले १० वर्ष वापराविना असून येत्या आषाढी एकादशी निमित्त खुले करण्यात यावे अशी मागणी ठाणे भाजपाने केली आहे. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीने ही मागणी केली आहे.
ठाणे महापालिकेने उभारलेल्या वारकरी भवनाचे लोकार्पण होऊन १० वर्ष उलटली. मात्र, वारकरी भवनात एकाही वारकऱ्याचे पाऊल पडले नाही. आता किमान आषाढी एकादशीच्या कार्यक्रमानिमित्ताने दोन दिवसांसाठी तरी वापराला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीनेकेली आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने ह. भ. प. एकनाथमहाराज सद्गगीर यांच्या उपस्थितीत भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे दोन दिवसांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी ठाण्याचे वारकरी भवन आरक्षित करून द्यावे अशी मागणी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आली. भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे समन्वयक विकास घांग्रेकर यांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला आहे.
हे ही वाचा:
…आणि बघता बघता पार्किंगमधली कार बुडाली
शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध
ख्वाजा मेरे ख्वाजा…बीएमसी दिला जा
पटोलेंना व्हावेसे वाटते मुख्यमंत्री; मग उद्धव ठाकरेंचे काय?
या संबंधीचे निवेदन भाजपाच्या वतीने ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांना देण्यात आले आहे. या वेळी भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव संदिप लेले, नगरसेवक सुनेश जोशी यांच्यासह वारकऱ्यांचीही उपस्थिती होती. या वेळी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.