संभाजीराजे छत्रपती हे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजपाचेच खासदार आहेत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संभाजीराजे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपाचे खासदार आहेत. मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
ते आज (शनिवारी) इस्लामपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संभाजीराजे यांच्या आंदोलनाविषयीच्या भूमिकेवर बोट ठेवले. संभाजीराजे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भाषा करतात. मात्र, लोकप्रतिनिधींना जाब विचारुन हा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तुम्ही मराठा आरक्षणासाठी वाट बघणार आहात की वाट लागण्याची वाट पाहणार आहात. या विषयात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आंदोलनात कोणी चाल ढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता संभाजीराजे यावर काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर
बीएसएफकडून चीनी गुप्तहेराला अटक
महाराष्ट्रातील हे जिल्हे चिंताजनक…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या १६ तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे संभाजीराजे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा आमदार आणि खासदार मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णायक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.