तुर्कीच्या कमकुवत झालेल्या डिफेन्सचा फायदा ७९ व्या मिनिटात इटलीच्या लॉरन्झो इन्सिग्ने याने घेतला आणि गोल केला. याच गोल सोबत इटलीने एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. युरो ग्रूप स्टेज सामन्यांमध्ये प्रथमच इटलीने कोणत्याही संघासमोर ३-० अश्या गोल फरकाने सामना जिंकला.
युरो २०२० ला काल सुरवात झाली. २४ संघ हे पुढचा एक महिना एकमेकांशी लढणार आहेत आणि एक विजेता त्यातून ही ट्रॉफी घेऊन जाणार आहे. कालची पहिली लढत ही इटली विरुद्ध तुर्की अशी होती. एकूण ६ ग्रूप्स आहेत आणि त्यातली ग्रुप ए मधे असणाऱ्या इटली आणि तुर्की यांची लढत काल झाली. खरतर युरो २०२० ही स्पर्धा मागच्या वर्षीच होणार होती परंतु कोविड मुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. पण २०२१ मधे ही स्पर्धा घेण्यात येत आहे. आणि याचा पहिला सामना इटली आणि तुर्की यांच्यात झाला.
सामन्याचा पहिला हाफ किंवा पहिली ४५ मिनिटे दोन्ही संघ तोडीसतोड खेळताना दिसत होते. सामन्याचा २१ व्या मिनिटात इटलीला एक कॉर्नर मिळाला. जॉर्जिओ कियलिनी याचा एक सुंदर हेडर त्याच सुंदर पद्धतीने तुर्कीचा गोलकीपर उर्जान चेकर याने अडवला. पहिला हाफ संपला त्यावेळी सामना ०-० अश्या स्थितीत होता.
सामन्याचा दुसरा हाफ सुरू झाला आणि ५३ व्या मिनिटात तुर्कीच्या मेरीह डेमिरल याने ओन गोल करून इटलीला बढत मिळवून दिली आणि इथूनच तुर्की सामन्यातून बाहेर होताना दिसू लागली. ६६व्या मिनिटात सिरो इंबोबिले याने गोल केला. उर्जान चेकर हा घाईने गोल पोस्ट च्या समोर आला आणि इंबोबिलेने याचाच फायदा घेऊन गोल केला आणि इटलीने २-० अशी बढत घेतली. तूर्कीचा डिफेन्स ढासाळताना दिसत होता आणि परत याचा फायदा ७९ व्या मिनिटात इटलीच्या लॉरन्झो इन्सिग्ने याने घेतला आणि गोल केला. २०१८ च्या फुटबॉल विश्वचषकात इटली पात्र झाला नव्हता त्यामुळे इटलीची युरो २०२० ची सुरुवात चांगली झाली असच म्हणावं लागेल. आज एकूण २ सामने होणार आहेत. संध्याकाळी ६:३० वाजता वेल्स विरुद्ध स्विझरलँड आणि रात्री ९:३० वाजता डेन्मार्क विरुद्ध फिनलँड.