मुंबईतील सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल हयात रिजन्सी बंद होत आहे. कोरोनामुळे झालेले प्रचंड आर्थिक नुकसान, पर्यटनाला बसलेली खीळ आणि ग्राहकांची रोडावलेली संख्या लक्षात घेता कर्मचाऱ्यांना पगार देणेही शक्य नसल्याने हॉटेलला टाळे लागणार आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार मुंबई विमानतळाच्या जवळच असलेल्या या हॉटेलचे महाव्यवस्थापक हरदीप मारवा यांच्या मते हॉटेलच्या मूळ मालकांनी ते चालविण्यासाठी पैसा नसल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
मुंबई पोलिसांच्या वाहनाच्या ताफ्यात ‘एटीव्ही’
भाजपामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही
पुणे आग: मोदींनी जाहीर केली मदत, मुख्यमंत्री ठाकरे निद्रिस्त
खलिस्तान्यांना शहिद म्हणत भज्जीची हिट विकेट
हयात रिजन्सी मुंबईचे मालक असलेल्या एशियन हॉटेल्स (वेस्ट) यांच्याकडून सध्या कोणताही निधी उपलब्ध होत नसल्यामुळे ते बंद करावे लागते आहे. हॉटेल चालविण्यासाठी तसेच पगार देण्यासाठी पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे या घडीपासून हॉटेलचे सर्व काम थांबविण्यात येत असून पुढील तारीख जाहीर होईपर्यंत हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे.
हॉटेल उद्योगाला कोरोनाच्या या संकटकाळात मोठा फटका बसला असून लॉकडाऊन लागल्यापासून पर्यटन बंदच आहे. त्यामुळे हा उद्योग संघर्ष करत आहे. त्यातच आता दुसरी लाट आल्यानंतर त्या संघर्षात भर पडली आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यात कोरोनाची रुग्णसंख्या तसेच बळींची संख्या वाढत चालल्यामुळे पर्यटनावर मोठी मर्यादा आली आहे. विविध देशांच्या विमानसेवाही खंडित असल्यामुळे पर्यटक एका देशातून दुसऱ्या देशात जाणेही कठीण आहे. त्यामुळे पर्यटनाची साखळी पूर्णपणे तुटली आहे. हा उद्योग सावरण्याची चिन्हे नाहीत. हयातसारखे पंचतारांकित हॉटेल बंद झाल्यामुळे या उद्योगाला एक मोठा धक्का बसला आहे.