भारताने लसीकरणाच्या धोरणात गोंधळ घातला असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातो. किंबहुना, खिल्ली उडविली जाते. आपण लसीकरणात कमी पडलो असे दावे करत हेटाळणी केली जाते. मुख्य म्हणजे ते करताना मुख्य लक्ष्य असते ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत लसीकरणात कसा मागे पडला आहे हे सांगण्याचा हेतू त्यामागे असतो. पण आज जगातील विविध देशांतील लसीकरणाचे प्रमाण पाहिले तर त्या तुलनेत भारताने केलेले लसीकरणाचे प्रमाण हे अतिशय कौतुकास्पद आहे, हेच स्पष्ट होते.
सध्या भारताचे लसीकरणाचे प्रमाण प्रति १०० माणसांमागे १६ डोस इतके आहे. म्हणजे २३ कोटी लोकांना आपण लस दिलेली आहे. १६ जानेवारी २०२१पासून आपण लसीकरणाला प्रारंभ केला. जवळपास त्याचवेळेपासून इतर देशांनीही लसीकरणाला प्रारंभ केला. म्हणजे गेल्या साडेचार महिन्यांत आपण हा स्तर गाठला आहे. जागतिक स्तरावर तर प्रत्येक १०० माणासांमागे २६.३ डोस देण्यात आले आहेत. जगात आज २ अब्ज ४ कोटी ९१ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. चीनचे लसीकरणाचे प्रमाण १०० माणसांमागे ५० डोस असे आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास ७२ कोटी डोस दिल्याचा दावा केला जातो आहे. भारताची लोकसंख्या १ अब्ज ३८ कोटी आहे तर चीनची १ अब्ज ४३ कोटी.
हे ही वाचा:
भारत, अमेरिका, चीनला मिळाल्या ६० टक्के लसमात्रा
नायजेरियाची ट्विटर बंदी, ‘कू’ साठी संधी
चित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम
‘ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली’
या दोन देशांच्या लोकसंख्येत फार मोठा फरक नाही. पण तरी लोक ब्रिटन, जर्मनी, अमेरिका वगैरे देशांशी भारताची तुलना करतात. ही तुलना हास्यास्पद ठरते. मुळात ब्रिटनची लोकसंख्या ६ कोटी ७८ लाख म्हणजे महाराष्ट्राच्या अर्धी. ब्रिटनमध्ये प्रत्येक १०० माणसांमागे ९९.१ डोस दिले गेले आहेत. याची तुलना भारताशी करणे हा निव्वळ मूर्खपणा म्हटला पाहिजे. अमेरिकेचीही तीच स्थिती. तिथे प्रत्येक १०० माणसामागे ८९ डोस दिले आहेत. अमेरिकेची लोकसंख्या आहे ३३ कोटी. म्हणजे भारतातील दोन मोठ्या राज्यांच्या बरोबरीची. तरी भारतातील काही महाभाग ही तुलना भारताशी करतात. जर्मनी, फ्रान्स यांची लोकसंख्या अनुक्रमे ८ कोटी आणि साडेसहा कोटी. तरी त्यांचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. जर्मनीने ५ कोटी ३४ लाख डोस दिलेत तर फ्रान्सने ३ कोटी ८० लाख डोस दिलेत. जर्मनी, ब्रिटन यांनी डिसेंबरमध्येच लसीकरणाला प्रारंभ केला तरी अद्याप त्यांचे लसीकरण १०० टक्के झालेले नाही. जर्मनीने तर एका महिन्यात १२ लाख लोकांना तर ब्रिटनने ४० लाख लोकांचे लसीकरण केले. हा वेग तेथील कमी लोकसंख्या आणि त्यामुळे लसीकरणावर येणारा कमी ताण यातून राखता आला आहे.
रशियासारख्या देशाला तर ३ कोटी जनतेचे लसीकरण करता आले आहे. रशियाची लोकसंख्या आहे १४ कोटी आहे. आपले शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात तर १०० माणसांमागे केवळ ३ डोस दिले गेले आहेत. त्यांची लोकसंख्या २२ कोटी आहे. जपानसारख्या प्रगतीशील देशात तर कोरोनाचे प्रमाण अल्प आहे. मात्र तरीही त्यांनी लसीकरणात प्रगती केलेली नाही. लोकसंख्या अवघी १२ कोटी आहे पण केवळ १ कोटी लोकांचे लसीकरण तिथे झालेले आहे.
हे सगळे करत असताना भारताने परदेशात लसीही दिल्या आहेत. त्यावरून याच महाभागांनी केंद्र सरकारवर टीका केली. आपल्या मुलांना प्रथम लस द्या मगच इतरांना द्या असा बिनडोक युक्तिवादही करण्यात आला. परदेशातून येणारा ऑक्सिजन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, रेमडेसिवीर यांचा पुरवठा होत असताना तेही आम्हाला नको अशी भूमिका घेणारे मात्र विरोधक दिसले नाहीत. या एकूण परिस्थितीत भारताने केलेले लसीकरणाचे काम संथगतीने सुरू असले तरी इतर देशांची लोकसंख्या आणि त्यामुळे त्यांच्यावर असलेले लसीकरणाच्या जबाबदारीचे ओझे या तुलनेत भारताने केलेली कामगिरी नक्कीच उजवी आहे.