ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा आगामी भारत दौरा रद्द झाला आहे. जॉन्सन हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार होते. पण ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोविड १९ च्या नव्या प्रकारामुळे तेथील पार्श्वभूमी चिंताजनक झाली आहे. त्यामुळे जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे.
डिसेंबर २०२० मध्ये ब्रिटनमध्ये कोविड १९ चा एक नवा प्रकार सापडला होता. ज्यामुळे साऱ्या जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावलेला असून नागरिकांवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. या कठीण परिस्थितीत ब्रिटनमध्ये राहून परिस्थिती हाताळण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी या संबंधी माहिती दिली आहे. “पंतप्रधानांनी (बोरिस जॉन्सन) सकाळीच भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधला आहे. ते या महिना अखेरीस भारतात येऊ शकत नाहीत यासाठी त्यांनी खेद व्यक्त केला आहे.”