छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लेखन असलेल्या रेनिसान्स स्टेट या गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाबद्दल महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे, पण राज ठाकरे त्यावर एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत. लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात मुलाखत घ्यायला समोर हेच गिरीश कुबेर असतानाही राज ठाकरे यांनी या पुस्तकातील त्या आक्षेपार्ह लेखनाबद्दल चकार शब्दही काढला नाही, त्यामुळे लोक अचंबित आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपल्या पक्षाच्या ध्वजावर मिरविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या विधानावर कोणत्याही कोनातून भाष्य का केले नाही किंवा त्या मुद्द्यापासून आपली दृष्टी का फिरविली, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
हे ही वाचा:
आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला
रा.स्व.संघाची बदनामी केल्याप्रकरणी ‘मुंबई सागा’च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस
जालना मारहाण प्रकरण, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचेही निलंबन
जुगाड करून सरकार बनवलतं पण जनतेच्या मनातून देवेंद्रजीना नाही काढू शकलात
एरवी पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांच्या अंगावर वसकन जाणाऱ्या राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात मात्र कुबेर यांना हा जाब विचारलाच नाही. खरे तर, या पुस्तकावर सगळ्याच स्तरातून झोड उठविण्यात आली. गिरीश कुबेर यांनी यासंदर्भात माफी मागावी आणि या पुस्तकावर बंदी आणली जावी, अशीही मागणी करण्यात आली. मात्र अशा गंभीर विषयाचा साधा नामोल्लेखही राज ठाकरे यांनी केला नाही.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बदलत्या आणि भविष्यात बदलणाऱ्या राजकारणाविषयी राज ठाकरे यांनी आपली मते व्यक्त केली. पण सर्वसामान्यांना त्यांच्या या मुलाखतीत या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराजांबाबतच्या आक्षेपार्ह लेखनाबद्दल त्यांचे मत जाणून घेण्याची इच्छा होती. मात्र त्यांनी स्वतःला या वादापासून जाणीवपूर्वक लांबच ठेवलेले आहे.
कुबेर यांच्या या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल केलेल्या लेखनाबद्दल महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे केली जात आहे. मात्र त्यावर राज्यातील ठाकरे सरकारही गप्प आहे आणि ठाकरे कुटुंबियांतील राज ठाकरे हेदेखील चिडीचूप आहेत.
भाजपा नेते नारायण राणे यांनीही या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर ठाकरे सरकारची मेहेरनजर असल्यामुळे येत्या काळात गिरीश कुबेर हे शिवसेनेचे खासदारही होतील, असे वक्तव्यही त्यांनी केले होते.
भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही या पुस्तकावर सडकून टीका केली होती. ‘चुकीच्या आणि खोडसाळ लेखांमुळे वादग्रस्त ठरलेल्या गिरीश कुबेर यांनी त्यांच्या ‘रेनिसन्स स्टेट’ या पुस्तकात ही बदनामीची परंपरा कायम राखली आहे. स्वधर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत अत्यंत खोडसाळ आणि द्वेषपूर्ण माहिती त्यांच्या पुस्तकात दिली आहे. या माहितीला समकालिन इतिहासातील कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. थोरल्या छत्रपतींचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत दिलेला हा बदनामीकारक मजकूर अत्यंत संतापजनक आहे,’ असे भातखळकर यांनी म्हटले आहे.