भारतीय औषध महानियामक मंडळाने (डिसीजीआय) अखेर परदेशी लशींचा देशात वापर करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता मॉडर्ना आणि फायझर या लशींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांनी मान्यता दिलेल्या लशींची आयात करण्यासाठी आता ट्रायलची गरज नसेल, असे डिसीजीआयने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता अमेरिका, इंग्लंड आणि जपानमध्ये मान्यताप्राप्त लसी भारतात आणल्या जाऊ शकतात. त्यासाठी कोणत्याही ट्रायलची गरज नसेल. यापूर्वी भारताने रशियन बनावटीच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या वापराला मान्यता दिली होती. १५ जूननंतर या लसीच्या वापराला सुरुवात होणार आहे. याशिवाय, रशियाचीच स्पुटनिक लाईट ही लसही लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. या लसीची केवळ एक डोस पुरेसा असेल. डॉ. रेड्डीज कंपनीकडून भारतात या लसींची निर्मिती आणि वितरण करण्यात येणार आहे.
आगामी काळात दिवसाला १ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्लॅन आहे. कोरोना लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर जुलै महिन्यापासून या मोहीमेचा शुभारंभ करण्यात येईल. सिरमकडून जून महिन्यात भारताला १० कोटी लसींचे डोस देण्यात येणार आहेत. तर भारत बायोटेककडूनही कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. याशिवाय, स्पुटनिक व्ही या रशियन लसीच्या वापरालाही मान्यता देण्यात आली आहे. अशाप्रकारे ३० ते ३२ कोटी डोस उपलब्ध झाल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून केंद्र सरकारकडून नव्या लसीकरण योजनेचा प्रारंभ केला जाईल.
हे ही वाचा:
सुशांत सिंह राजपूत प्रकरण, ड्रग पेडलर हरीश खानला अटक
आता कोरोनामुळे मृत झालेल्यांना ४८ तासांत मिळणार ५० लाख
आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत ५ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात १ लाख ३२ हजार ७८८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात ३ हजार २०७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. कालच्या दिवसात देशात २ लाख ३१ हजार ४५६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.