महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १ जून रोजी जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी मान्सूनपूर्व होणाऱ्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त जनतेने आपली गार्हाणी मांडली. ‘तुम्हीच आमचे मायबाप आहात’ असे म्हणत त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या विविध भागात हेच दृश्य बघायला मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘वर्क फ्रॉम होम’ मध्ये व्यस्त व्यस्त आहेत. तर विरोधी पक्ष नेते राज्याचा दौरा करून जनतेचे प्रश्न समजून घेत आहेत त्यामुळे जनताही सरकारकडून अपेक्षा न करता विरोधी पक्षाकडूनच मदतीची अपेक्षा करताना दिसत आहे.
मंगळवारी फडणवीस यांनी आपल्या जळगाव जिल्ह्याचा पाहणी दौरा सुरु केला. यावेळी त्यांनी मुक्ताईनगर येथील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. वादळी पावसामुळे या परिसरातील केळी बागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या साऱ्या नुकसानग्रस्त भागाची फडणवीस यांनी पाहणी केली. तर त्याचवेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपल्याला नुकसान भरपाई मिळावी असे गाऱ्हाणे फडणवीस यांच्याकडे मांडले. ‘तुम्हीच आमचे माय बाप आहात, तुम्हीच आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्या’ अशी विनंती नागरिकांनी फडणवीसांना केली. या संबंधीचा एक व्हिडिओ फडणवीस यांनी आपल्या ट्विटर वर शेअर केला आहे. तर त्याच वेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
माझी विनंती आहे की, विमा कंपन्यांनी सरसकट नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकर्यांपुढे कोणत्याही अडचणी निर्माण करू नयेत.
राज्य सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. ज्यांचा विमा नाही, त्यांनाही मदत दिली पाहिजे. आपल्या सरकारच्या काळात विमा काढला असे समजून मदत देण्यात आली होती. pic.twitter.com/gwLtRtQqAk— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 1, 2021
हे ही वाचा:
मीरा चोप्रा लसीकरण प्रकरण, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची भाजपाची मागणी
मुंबई महापालिका निवडणुका होणार! निवडणूक आयोगाचा हिरवा कंदिल
काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली
विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांकडे कोणत्याही अडचणी निर्माण करू नयेत अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसेच राज्य सरकारनेही या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. ज्या लोकांचा विमा नाही त्यांनाही मदत दिली पाहिजे अशी मागणी फडणवीसांनी सरकारकडे केली आहे. तर फडणवीस मुख्यमंत्री असताना हरिभाऊ जावळे यांची समिती गठीत करून ठरवलेले विम्याचे निकष हे ठाकरे सरकारच्या काळात बदलले गेले आहेत. त्यामुळे पूर्वी शेतकऱ्यांना जो विम्याचा फायदा होऊन चांगला पैसा मिळायचा तो आता मिळत नाही. तर फक्त विमा कंपन्यांनाच लाभ होताना दिसत आहे असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे विम्याचे जुने निकष तात्काळ लावण्यात यावेत अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
आपल्या सरकारच्या काळात हरिभाऊ जावळे यांची समिती गठीत करून विम्याचे निकष ठरवून तशा निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे सातत्याने चांगला पैसा शेतकर्यांना मिळाला.
नवीन निकषांनी निविदा काढल्याने आता केवळ विमा कंपन्यांना लाभ. जुने निकष तत्काळ लागू केले पाहिजे. pic.twitter.com/U2fLYozkQk— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 1, 2021
कोविडच्या या संपूर्ण काळात म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तसेच निसर्ग आणि तौक्ते वादळांसारख्या अस्मानी संकटात विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण राज्याचा झंझावती दौरा करताना आढळून आले आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरूनच राज्याचा कारभार हाकत असल्याचे दिसून आले आहे. तौक्ते वादळाचे ताजे उदाहरण पाहिले तर देवेंद्र फडणवीस यांनी कोकणच्या नुकसानग्रस्त भागाचा तीन दिवसाचा पाहणी दौरा केला तर त्या तुलनेत मुख्यमंत्र्यांनी तीन तासात कोकणाला धावती भेट दिल्याचे दिसून आले. या गोष्टी राज्याच्या जनतेच्याही लक्षात येताना दिसत आहेत. त्यामुळेच जनताही मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षांकडे आपल्या मागण्या मांडताना दिसत नाहीयेत. याउलट विरोधी पक्षनेत्यांकडे आपल्या मागण्या मांडताना दिसत आहेत आणि मदतीची अपेक्षा करत आहेत.