पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी देशातील ८ सदस्यीय टीम डोमिनिकामध्ये तळ ठोकून आहे. ईडी, सीबीआयसह सीआरपीएफचे २ कमांडोही या टीममध्ये हजर आहेत. मेहुल चोक्सीशी संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन टीम डोमिनिकाला गेली आहे. ही टीम डोमिनिका येथे पोहोचल्यानंतर अँटिग्वाच्या पंतप्रधानांनीही खातरजमा केली, भारतीय अधिकारी खासगी विमानाने डोमिनिका येथे पोहोचले. मेहुल चोक्सीचे लवकरात लवकर प्रत्यार्पण करण्यासाठी डोमिनिका येथून भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सीबीआयचे प्रमुख शारदा राऊत या संघाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांनी पीएनबी बँक घोटाळ्यातील चौकशीचे नेतृत्व केले. शुक्रवारीच सीबीआय आणि ईडी अधिकाऱ्यांना मुंबई झोनमधून दिल्ली येथे बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. नंतर हे पथक डोमिनिकाच्या खासगी विमानात बसले आणि डोमनिकाला पोहोचले. तोपर्यंत डोमिनिकाला पाठविलेल्या एकूण अधिकाऱ्यांची आणि टीममधील सीबीआय अधिकाऱ्यांची संख्या याबद्दल कोणताही खुलासा झालेला नव्हता.
ब्राऊनने रेडिओ शोमध्ये सांगितले की, चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन हे विमान भारतातून आले होते. कतारच्या एक्सझिक्युटिव्ह विमान ए ७ सीईई च्या सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीनुसार विमान २८ मे रोजी सकाळी ३:४४ वाजता दिल्ली विमानतळावरून निघाले आणि त्याच दिवशी स्थानिक वेळेनुसार रात्री १:१६ वाजता ते डोमिनिकाला पोहोचले. ‘अँटिग्वा न्यूज रूम’ च्या वृत्तानुसार, कतार एअरवेजचं एक खासगी विमान डोमिनिकाच्या डग्लस-चार्ल्स विमानतळावर उतरले.
हे ही वाचा:
२०२१ मध्ये भारतात १०१ टक्के पाऊस पडणार
मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव
ठाकरे सरकारच्या बेपर्वाईने, ओबीसींचा राजकीय हक्क डावलला जाणार
चीनमध्ये आता अपत्ये तीन, लेकुरे उदंड होणार
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणावर कॅरिबियन कोर्टाने स्थगिती दिली होती. यापूर्वी अँटिग्वा आणि बारबुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी डोमिनिकाच्या अधिकाऱ्यांना मेहुल चोक्सीला भारतात प्रत्यार्पण करण्यास सांगितले आहे. कारण अँटिग्वामध्ये मेहुल चोक्सीकडे जास्त अधिकार आहेत. बुधवारी कोर्टाच्या सुनावणीदरम्यान भारतीय अधिकारी डोमिनिका सरकारला प्रतिज्ञापत्र देण्यास सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, जेणेकरून मेहुल चोक्सीला भारतात प्रत्यार्पणासाठी पाठवले जाऊ शकते. मेहुल चोक्सी हा भारताचा नागरिक असल्याचा पुरावा भारताच्या टीमनं दिला आहे.