ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आयएएस अधिकारी आणि पश्चिम बंगालचे मुख्य सचिव असणारे अल्पन बंडोपाध्याय यांच्या केंद्र सरकारने केलेल्या बदलीला रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धावपळ करत आहेत. शुक्रवार, २८ मे रोजी केंद्र सरकार कडून यासंबंधीचे पत्रक काढून बदलीचे आदेश जारी करण्यात आले होते. ३१ मे ला सकाळी १० पर्यंत अल्पन यांना नव्या कामाच्या ठिकाणी रुजू व्हायचे आदेश होते. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्यांना राज्य सरकारच्या सेवेतून मुक्त न केल्यामुळे त्यांना केंद्रीय सेवेत जात आलेले नाही. ममता बॅनर्जींनी याबाबत पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे.
“या कठीण काळामध्ये पश्चिम बंगाल सरकार मुख्य सचिवांना सेवेतून मुक्त करू शकत नाही, करणार नाही.” असे पात्र ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिले आहे. या पात्रातून ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांना अल्पन बंडोपाध्याय यांच्या बदलीच्या आदेशाचा पुनर्विचार करावा असे आवाहन केले आहे.
"West Bengal Govt can't release & is not releasing its Chief Secretary at this critical hours," West Bengal Chief Minister Mamata Banerjee wrote to PM requesting to withdraw, recall, reconsider the decision & rescind latest so-called order
— ANI (@ANI) May 31, 2021
पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांना केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागात बदली करून पाठवण्यात आले होते. अल्पन बंडोपाध्याय हे पश्चिम बंगाल सरकारचे मुख्य सचिव असून त्यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. पण त्यांचा कोविड हाताळणीचा अनुभव बघता त्यांना मुदतवाढ मिळावी अशा प्रकारचे निवेदन पश्चिम बंगाल सरकारतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार बंडोपध्याय यांना तीन महिन्याची मुदतवाढ दिली असल्याचे सांगण्यात येत होते. पण २८ मे रोजी केंद्र सरकार आदेशानुसार बंडोपाध्याय यांची बदली झाल्याचे स्पष्ट होत आहे. बंडोपाध्याय हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट?
मेट्रो २अ, मेट्रो ७ ची चाचणी आज
दहा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट
पश्चिम बंगालची निवडणूक झाली असली तरीही भाजपा विरुद्ध तृणमूल हा सामना नियमितपणे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आल्या दिवशी भारतीय जनता पार्टी विरोधात वेगवेगळ्या कारणांवरून मोर्चा उडताना दिसत आहेत. याचाच प्रत्यय २८ मे, शुक्रवारी ‘यास’ या चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी हे पश्चिम बंगालमध्ये आले होते. पण ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्य सचिवांच्या समवेत मोदींना अर्धा तास ताटकळत ठेवले. या चक्रीवादळाच्या आढावा बैठकीला त्या आल्याच नाहीत त्यांनी फक्त उपस्थिती लावून मोदींसोबत पंधरा मिनिटाची चर्चा करण्याची औपचारिकता दाखवली. मी तुम्हाला भेटायला इथे आले आहे. मुख्य सचिवांना आणि मला तुम्हाला एक निवेदन द्यायचे आहे असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदींकडे एक निवेदन सादर केले. त्यानंतर पुढील काही कार्यक्रम लागले असल्याचे सांगत त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांची बदली झाल्यामुळे यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.