गेल्या वर्षी कोरोनामुळे बळी गेलेले पत्रकार पांडुरंग रायकर यांना अखेर नरेंद्र मोदी सरकारने ५ लाखांची मदत केली. टीव्ही ९ चे पत्रकार असलेले रायकर हे गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात वार्तांकन करत होते. त्या दरम्यानच त्यांना लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला होता. त्यांना वेळीच वैद्यकीय सुविधा मिळू न शकल्याने त्यांचा या महामारीत मृत्यू ओढवला होता. पण आता केंद्र सरकारने त्यांच्या कुटुंबियांना ही मदत केली आहे. ठाकरे सरकारने त्यांच्या कुटुंबियांना मदतीपासून वंचित ठेवले होते. अखेर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनेच त्यांना मदतीचा हात दिला.
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून पाच लाखांचे अर्थसहाय्य मिळाले आहे. सप्टेंबरमध्ये रायकर यांचे निधन झाले. त्यानंतर वर्षभर त्यांचे कुटुंबीय ठाकरे सरकारकडे मदतीची याचना करत होते. रायकर यांच्या पत्नी शीतल यांनीही फेसबुक पेजवर सरकारच्या या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या त्यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी गेल्या वर्षी करण्यात आली होती, पण तीही चौकशी होऊ शकली नाही. त्याबद्दलही रायकर यांच्या पत्नीने नाराजी प्रकट केली.
हे ही वाचा:
योगींनी पत्रकारांना दिले, महाराष्ट्रातील पत्रकारांचे काय?
पंतप्रधानांच्या ‘युवा’ योजनेतून तरुण लेखकांना प्रोत्साहन
अनिल देशमुख नंतर अनिल परब, फक्त दोन महिन्यांचे पाहुणे
कोविडमुळे कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना निवृत्ती वेतन, विमाभरपाई
कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून पाच लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर झाला होता. त्यानुसार संबंधित समितीच्या बैठकीत देशातील ६७ पत्रकारांच्या कुटुंबियांना प़त्येकी पाच लाख रूपये मंजूर करण्यात आले. महाराष्ट्रातून पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना ही रक्कम मिळाल्याचे शितल रायकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारने रायकर कुटुंबियांना पाच लाखांची मदत दिली असली तरी राज्य सरकारने वारंवार आश्वासने देऊनही रायकर कुटुंबियांना कसलीच मदत केली नाही, त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. राज्यातील जे १३६ पत्रकार कोरोनाचे बळी ठरले आहेत, त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने केंद्र सरकारकडे मदतीसाठी अर्ज करावेत,या कुटुंबियांना तालुका पत्रकार संघांनी मदत करावी, असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे.