कोरोनामुळे राज्यातील जवळपास २९१५ बालकांनी आपले पालक गमावले आहेत. या महामारीच्या लाटेत ११४ बालकांचे आई वडिल दोघांचेही कोरोनामुळे निधन झालेले आहे. तर २८०१ बालकांच्या एका पालकाचा मृत्यू झाल्याची बाब नुकतीच समोर आली. महिला व बालविकास विभागाच्या पाहणीत ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. या मुलांना राज्यसरकारतर्फे आर्थिक आधार देण्याची मागणी आता महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे.
दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ मुलांच्या नावे राज्य सरकारने ५ लाख रुपयांची मुदत ठेव करावी. तसेच त्यातून येणारे व्याज मुलांना देण्यात यावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. केवळ इतकेच नाही तर, एक पालक गमावलेल्या मुलांचा समावेश बाल संगोपन योजनेत करुन त्यांना दरमहा २५०० रुपये मदत मंजूर करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आता हे आव्हान ठाकरे सरकार कसे पेलते ते पाहावे लागेल.
हे ही वाचा:
राज्यभरात ५० टक्के उपाहारगृहे, पोळीभाजी केंद्रचालक उपाशी
कोविड-१९ रुग्णसंख्येत पुन्हा घट, १.७३ लाख नवे रुग्ण
सगळं मोदीच करणार तर मग तुमची गरजच काय?
कोरोनामुळे ३७५ बालकांचे मातृछत्र हरपले असून, २४२६ बालकांचे पितृछत्र हरवले आहे. महिला व बालविकास विभागाने आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांना ही माहिती दिली. राज्यातील सर्वाधिक पालक गमावलेल्या बालकांची संख्या ५०७ असून, ते भंडारा जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर सोलापूर २३४, औरंगाबाद २३३ अशी अनुक्रमे शहरे आहेत.
कोरोनामुळे भारतासारख्या देशात किती मुले अनाथ झाली असतील हे शोधणे खूपच कठीण असल्याचे मत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. अशा अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांना मदत करण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आलेले आहेत. न्यायलयाकडून आदेशाची वाट न पाहता या लहान मुलांचे पालन करावे, असा आदेश न्यायालयाने राज्य तसेच जिल्हा प्रशासनाला दिला आहे.