आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ऑलिंपिक स्पर्धा २०२० मध्ये टोकियोत होणार होत्या. परंतु, कोरोनामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर या स्पर्धेचे आयोजन जुलै २०२१ मध्ये करण्यात येणार होते. परंतु सध्या पुन्हा एकदा कोरोनामुळे या स्पर्धेच्या आयोजनावर टांगती तलवार आहे. अर्थात याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नसताना, खुद्द जपानमध्ये या स्पर्धांच्या विरोधातील आवाज वाढू लागला आहे.
या स्पर्धेच्या आयोजकांनी मात्र ही स्पर्धा होणारच असल्याचे सांगितले आहे. कडक नियमांचे पालन करून जपानी नागरिक आणि खेळाडू सुरक्षित राहतील असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. ‘आसाही’ या जपानी वृत्तपत्राच्या संपादकीयमधून जपानी पंतप्रधान योशिहिडे सुगा यांना संपूर्ण परिस्थिती समजून घेऊन उन्हाळी ऑलिंपिक रद्द करण्याची विनंती केली आहे. या वृत्तपत्राच्या मते, भलेही आयोजकांनी सर्वांच्या सुरक्षिततेची हमी दिली असली तरीही याबाबत कोणत्याही प्रकारचा जुगार खेळला जाऊ शकत नाही.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणावर दहा मिनिटांत सकारात्मक चर्चा?
ठाकरे सरकारमध्ये शिवसेनाच नाराज?
भाजपाचा शिवसेनेला ‘दे धक्का’, माथेरानमध्ये १० नगरसेवक फोडले
महाराष्ट्रातील सत्ताधार्यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी
इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीचे उपाध्यक्ष जॉन कोट्स यांच्यावर देखील या वृत्तपत्रातून निशाणा साधण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात त्यांना या संकटसमयात ही स्पर्धा झाली पाहिजे का असा सवाल करण्यात आला होता, त्यावेळेस त्यांनी ‘निश्चितच हो’ असे उत्तर दिले होते. त्यावरून त्यांना लक्ष्य केले गेले आहे.
सध्या टोकियो आणि जपानच्या अनेक भागांत आपात्कालिन परिस्थिती घोषित करावी लागली आहे. या परिस्थितीला बहुदा २० जूनपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत होकारार्थी उत्तर देणे हे आयओसी स्वार्थी असल्याचे चिन्ह असल्याची टीका करण्यात येत आहे.
स्थानिक प्रशासनाने कुठल्याही प्रकारे साथ इतरत्र पसरू नये अशी खबरदारी घेतली असल्याचे आयोजकांकडून सांगितले जात आहे. टोकियो २०२० चे सीईओ टोशिरो मुटो यांनी, विविध माध्यमांची विविध मते असणे योग्य आहे असे म्हटले होते, परंतु लोकांमध्ये अस्वस्थता असल्याचे देखील त्यांनी मान्य केले होते.
जपानी उद्योगक्षेत्रातील दोन बड्या कंपन्यांनी देखील जपानमधील ऑलिंपिकच्या आयोजनाच्या विरोधातील आवाजात आपला सूर मिसळला आहे.
ऑलिंपिक स्पर्धा रद्द झाल्यास जपानी अर्थव्यवस्थेला १.८ ट्रिलीयन येन किंवा १६.६ बिलीयन डॉलर इतका फटका पडणार आहे. परंतु, जर या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि रुग्णसंख्या आटोक्याबाहेर गेली, तर अधिक मोठा आर्थिक फटका बसेल असे, जपानमधील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या सगळ्या कोलाहालात ऑलिंपिक बाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.