माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेचे १० नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागले आहेत. गुरुवार, २७ मे रोजी या नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला या १० नगरसेवकांचे शिवसेनेला रामराम ठोकणे हा पक्षासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. तर यामुळे माथेरान नगरपालिकेत शिवसेना अडचणीत सापडली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुक निकालानंतर महाराष्ट्रात घडलेल्या सत्ता नाट्यामुळे भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये कमालीची कटूता अली असून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी शोधत असतात. या प्रयत्नात अनेकदा राज्यात फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वी जळगावमध्ये भाजपाचे नगरसेवक शिवसेनेने फोडले आणि त्यांना पक्षात सामावून घेतले. यामुळे भाजपाची जळगाव महापालिकेतील सत्ता गेली. तर आता भाजपाने माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेचे दहा नगरसेवक फोडले आहेत. या सर्व नगरसेवकांना कोल्हापूरला हलविण्यात आले असून गुरुवारी सकाळी भाजपा अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत या १० जणांनी कमळ हाती घेतले. या १० जणांमध्ये माथेरान नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणावर दहा मिनिटांत सकारात्मक चर्चा?
ठाकरे सरकारमध्ये शिवसेनाच नाराज?
संबित पात्रा केजरीवालांवर बरसले
ग्लोबल टेंडरच्या नावावर लस घोटाळा?
माथेरान नगरपालिकेत एकूण १७ नगरसेवकांपैकी १४ नगरसेवक शिवसेनेचे होते. पण आता त्यातील १० नगरसेवक हे भाजपाने फोडले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ अवघे ४ वर आले आहे. या कारणाने माथेरान नगरपालिकेत शिवसेना अडचणीत सापडली आहे.
शिवसेनेला राम राम ठोकून भाजपामध्ये सामील झालेल्या नागरसेवकांमध्ये उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या सह राकेश चौधरी, सोनम दाबेकर, प्रतिभा घावरे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनवळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव, आणि रुपाली आखाडे या नागसेवकांचा समावेश आहे.