देशात कोरोनाच्या प्रादुर्भावासह आता ब्लॅक फंगस म्हणजेच काळी बुरशी अर्थात म्युकरमायकोसिस या आजारानं थैमान घातलंय. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वेगाने होणाऱ्या वाढीसह त्याचा धोकाही वाढलाय. अशावेळी अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्यात आलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मे रोजी सकाळपर्यंत देशातील एकूण १८ राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) एकूण ५ हजार ४२४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये २ हजार १६५, महाराष्ट्रात १ हजार १८८, उत्तर प्रदेशात ६६३, मध्य प्रदेशात ५१९, हरियाणात ३३९ आणि आंध्र प्रदेशात २४८ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. देशात आढळलेल्या म्युकरमायकोसिसच्या ५ हजार ४२४ रुग्णांपैकी ४ हजार ५५६ जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर ५५ टक्के रुग्णांना पहिल्यापासूनच मधुमेहाची समस्या होती.
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॅक फंगस हा आजार कोरोनाच्या आधीही अस्तित्वात होता. तसंच हा आजार मधुमेह असलेल्या व्यक्तीला, ज्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात नाही अशा लोकांना जास्त धोका असल्याचं वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी सांगतात. साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसण्याबरोबरच अन्य आजारही ब्लॅक फंगसचे कारण बनू शकतात.
डॉ. पॉल यांनी सांगितलं की, ज्यांची शुगर लेव्हल ७०० ते ८०० पर्यंत पोहोचते, त्याला डायबिटीक कीटोएसीडोसिस असंही म्हणतात. अशा रुग्णांना ब्लॅक फंगसचा धोका अधिक असतो. अशास्थितीत मुलांपासून वृद्धांपर्यंत कुणीही या आजाराला बळी पडू शकतो. दरम्यान, स्वस्थ व्यक्तीला ब्लॅक फंगसमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, अशा लोकांनाच या आजाराचा जास्त धोका असल्याचं एम्सचे डॉ. निखिल टंडन यांनी म्हटलंय.
हे ही वाचा:
वडेट्टीवारांना ओबीसी नेता होण्याची घाई, त्यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही
मराठा मूक मोर्चा आता ‘बोलका’ होणार?
मराठा आरक्षण राज्याचा विषय असल्यामुळे मोदी भेटले नाहीत
आदित्य ठाकरे दाखवा आणि फुकट लसीकरण मिळवा
ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसनेही देशात थैमान घातले आहे. त्यानंतर आता येलो फंगसने दस्तक दिली आहे. उत्तर प्रदेशात येलो फंगसचा पहिला रुग्णही सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. या येलो फंगसला म्युकोर सेप्टिकस हे नाव देण्यात आलं आहे. येलो फंगस आढळून आलेला रुग्ण गाझियाबादचा राहणारा आहे. ३४ वर्षाच्या या तरुणाला आधी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला मधुमेहाचाही त्रास आहे. ईएनटी सर्जन डॉक्टर बृज पाल त्यागी त्याच्यावर उपचार करत आहेत.