जोगेश्वरी पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाने पोलीस उपायुक्तांच्या दालनाबाहेर फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार अंधेरी एमआयडीसी येथे उघडकीस आला. पोलिसांनी या शिपायाला वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची बीसीसीआयकडून तयारी सुरू
कोरोनाविरुद्ध नव्हे, मोदींविरुद्ध लढणारा मुख्यमंत्री!
भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु सुशील कुमारला जालंधर येथून अटक
विठ्ठल खिल्लारे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तैनात असलेले खिल्लारे हे मिल्स स्पेशल (पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवणे) म्हणून होते. त्यांच्या विरुध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून खिल्लारे यांना मिल्स स्पेशलवरून काढण्यात आले होते. त्यांच्या जागी दुसऱ्या शिपायाला तैनात करण्यात आले होते. मिल स्पेशल वरून काढल्याचा राग आल्यामुळे खिल्लारे यांनी वरिष्ठांविरुद्ध पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. तक्रारीला दाद मिळत नसल्याचे बघून खिल्लारे यांनी दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वर असणाऱ्या पोलीस उपायुक्त कार्यालयात पोलीस उपायुक्त यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
उपायुक्तांनी त्यांना दालनाबाहेर थांबण्यास संगितले असता खिल्लारे यांनी उपायुक्तांच्या दलनाबाहेर येऊन सोबत आणलेले फिनाईल प्राशन केले. त्यानंतर त्यांना उलटीचा त्रास सुरू झाल्यामुळे उपायुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांना ताबडतोब उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात आणले. रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करून काही तासांनी त्यांना सोडण्यात आले.
एमआयडीसी पोलिसांनी या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करून खिल्लारेंकडे चौकशी केली असता माझी कुणाविरुद्ध तक्रार नसल्याचे खिल्लारे यांनी एमआयडीसी पोलिसांना सांगितले.