घरगुती गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी ठाण्यातील कळवा- विटावा परिसरात घडली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने स्थानिक आणि तेथून ये- जा करणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हे ही वाचा:
एअर इंडियावर सायबर हल्ला, प्रवाशांचा डेटा धोक्यात?
चक्रीवादळापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्र्यांचा दौरा
देण्यापेक्षा मागणं हाच ठाकरे सरकारचा बाणा
शेहजाद चर्चेत नको; काँग्रेसच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बुरखा फाटला
हरी ओम रोडवेज यांच्या मालकीचा हा ट्रक असून त्या ट्रकचे चालक मनोहर जाधव हे शनिवारी पहाटे उरण येथून घरगुती भारत पेट्रोलियमचे तब्बल २९४ गॅस सिलिंडर भरून नालासोपारा येथे निघाले होते. नवी मुंबईहून ठाणे मार्गे जाताना जाधव हे ट्रक कळवा- विटावा येथून विटावा रेल्वे ब्रीज खालून जाण्यापूर्वी त्यांना ट्रकच्या इंजिनमधून धूर येत असल्याची बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने रस्त्याच्या बाजूला ट्रक थांबवून ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला माहिती दिली.
त्यानुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टाळण्यात अग्निशमन दलाला यश आले. घटनेची माहिती मिळताच आपत्ती कक्ष कर्मचारी, पोलीस यांनी धाव घेतली होती. तसेच यावेळी एक फायर इंजिन आणि बचावमोहिमेसाठी रेस्क्यू गाडीला पाचारण केले होते. यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सिलिंडर ट्रकला आग लागल्याचे समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या घटनेवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.