सुजय पत्की यांची भारतीय जनता पार्टीच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी सुजय पत्की यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. या नव्या जबाबदारीमुळे पत्की यांच्या राजकीय इनिंगला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात मविआ सरकार विरुद्ध भाजप हा संघर्ष जनतेला रोज बघायला मिळत असतानाच लवकरच हा संघर्ष अजून तीव्र होणार आहे. कारण राज्यातल्या मुंबई, पुणे, ठाणे अशा सर्व महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका काही महिन्यांच्या अंतरावर आलेले आहेत. जास्तीत जास्त महापालिकेत आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आखणी करायला घेतली असून त्या दृष्टीने संघटना विस्ताराला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने सुजय पत्की यांच्यावर उपाध्यक्षपदाची मदार सोपवली गेली आहे. उपाध्यक्ष म्हणून पत्की हे प्रामुख्याने ठाणे महानगरपालिका, माध्यम आणि प्रशासकीय समन्वय अशी महत्त्वाची कामे बघणार आहेत.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा
भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा राहुल द्रविडकडे
हिंदूविरोधी उस्मानी विरोधात गुन्हा दाखल
२६/११च्या हल्ल्याला चोख जवाब देणारा जवान गमावला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनांमध्ये सुजय पत्की यांची वैचारिक जडणघडण झाली असून त्यांच्यातला कार्यकर्ता विकसित होत गेला. त्यानंतर गेली अनेक वर्ष सुजय पत्की हे थेट राजकारणात उतरले नसले, तरीही खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या सहवासात राहून ते अनेक प्रकारचे कार्यालयीन आणि प्रशासकीय समन्वयाचे कामकाज पाहायचे. पण आता ठाणे महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच पत्की यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली आहे. त्यांचा ठाण्यातील सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातही चांगला वावर असून त्यांच्या या प्रतिमेचा ठाणे भाजपाला फायदा होणार आहे.