तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी खेड इथं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. हे आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे. मागील निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत अजून मिळालीच नाही, आता तरी मदत मिळावी, असं फडणवीस म्हणाले.
कोकणात सलग दुसऱ्या वर्षी मोठं नुकसान झालं आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा दौरा आहे. कोकणाचं मोठं नुकसान झालंय, मात्र गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळालेली नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जाहीर झालेली मदत अद्याप मिळालेली नाही. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हे नेहमीचं झालंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे, ६०० गावातील लाईट गेली, ६०-७० हजार कुटुंबं अंधारात होती. शेतीचं, फळबागांचं मोठं नुकसान झालं, मच्छिमारांचं नुकसान झालं असून बोटी उद्ध्वस्त झाल्या आहेत. मागच्या निसर्ग चक्रीवादळावेळी ज्या घोषणा केल्या, त्यातील काहीच मिळालं नाही. आमची अपेक्षा आहे, दुसऱ्यांदा चक्रीवादळ आलंय, आता सरकारने मदत करावी, असं देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.
मागच्या वादळात वाड्याच्या वाड्या कोसळून पडल्या. झाडं उन्मळून पडली, जी झाडं मोठी होण्यासाठी १५ वर्ष लागतात, त्यांना १०० रुपये झाडामागे मिळालं, त्यामुळेच लोकांमध्ये नाराजी, नैराश्य आहे. लोकांना किमान पत्रे हवे होते, ते मिळाले नाहीत, जे लक्ष द्यायला हवं होतं सरकारने ते नाही दिलं, असा आरप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कुठल्याही गोष्टीला अर्धसत्य बोलायचं, दररोज सकाळी टीव्हीसमोर जाऊन खोटं बोलायचं, ही सवय झाली आहे. या चक्रीवादळाचा लँडफॉल गुजरातमध्ये होता. तिथे जास्त नुकसान आणि जास्त मृत्यू झाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथला दौरा केला. गुजरातला जशी मदत जाहीर केली, त्याच प्रेसनोटमध्ये उल्लेख आहे, इतर राज्यांनाही तशीच मदत केली जाईल, त्यामुळे ठाकरे सरकारला काही झालं की केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची सवय झाली आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
हे ही वाचा:
काँग्रेसकडून मोदी सरकारची नव्हे, देशाची बदनामी
समुद्राकडून ६७ हजार किलो कचरा साभार परत
मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, रासायनिक खतांच्या सबसिडीत १४०% वाढ
शेतकऱ्यांचे खरेखुरे मित्र पंतप्रधान मोदींचा खताबाबत शेतकऱ्यांना दिलासा
जिथे सर्वाधिक नुकसान झालंय तिथे मदत दिली, महाराष्ट्रालाही मदत मिळणारच आहे. पण नेहमी कांगावा करायचा आहे हेच या मंत्र्यांचं काम यातून महाराष्ट्राला मदत मिळणार नाही. हे सरकार फक्त आरडाओरड करण्यातच मग्न आहे, असं फडणवीस म्हणाले.