कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी देशभरात लसीकरण सुरु आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी करुनही लसीच्या कमतरतेमुळे लोकांना लस मिळत नाही. अशी सगळी परिस्थिती असताना भारतीय संघातल्या एका क्रिकेटपटूला लसीकरणासंबंधी असलेल्या सरकारी नियमांतून सूट मिळाली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचं कारण म्हणजे भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवने गेस्ट हाऊसच्या हिरवळीवर लस टोचून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला मिळालेली व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट उजेडात आल्यानंतर कानपूर जिल्हा प्रशासनाने त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कुलदीप यादव आता चांगलाच अडचणीत सापडला आहे.
कुलदीप यादवने १५ मे २०२१ रोजी दुपारी ३ वाजून एक ट्विट केलं. या ट्विटमधून त्याने लस घेतल्याची माहिती दिली. सोबत लस घेतानाचा एक फोटो त्याने शेअर केला. या फोटोतून स्पष्ट दिसत होतं की त्याने लस घेतलेली जागा ही लसीकरण केंद्र नव्हतं वा रुग्णालय देखील नव्हतं. एका हिरव्यागार लॉनवर त्याने लस घेतली होती. कुलदीपला व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट मिळाली की काय? अशी शंका अनेकांनी उपस्थित केली.
कुलदीप यादवने कोरोना लसीकरण नियमांचं उल्लंघन केलंय का? हे तपासण्याचे आदेश अनेकांच्या तक्रारीनंतर कानपूर जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कानपूरचे जिल्हाधिकारी आलोक तिवारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी अतुल कुमार यांना यासंबंधीचे आदेश देताना चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
एका अधिकाऱ्याने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, “कुलदीप गोविंदनगरमधल्या जागेश्वर रुग्णालयात लसीकरणासाठी जाणार होता. परंतु त्याला कानपीरमधल्या गेस्ट हाऊसच्या हिरवळीवर लस दिली गेली.”
हे ही वाचा:
मुंबई महानगरपालिकेनंतर आता राज्य सरकारचे ग्लोबल टेंडर
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा आज गुजरात दौरा
दहा कंपन्यांना लस बनवण्याचे लायसन्स द्या
‘लस- पर्यटनात’ भारतीयांची रशियाला पसंती
कुलदीपने ट्विट केलेल्या फोटोमध्ये हे स्पष्ट दिसत होतं की त्याने रुग्णालयात किंवा लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली नाही. त्यानंतर लोकांनी ट्विटरवरती त्याला प्रश्न देखील विचारले. विविध राज्याचे मुख्यमंत्री किंबहुना खुद्द देशाचे पंतप्रधान लस घेण्यासाठी रुग्णालयात जातात, मग कुलदीपला लस देताना नियमांची पायमल्ली का? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला.