अदानी विल्मार समुहाने सौरव गांगुलीसह केलेल्या फोर्च्युन राईस ब्रान खाद्यतेलाच्या सर्व जाहिराती तात्काळ थांबवल्या आहेत. बी.सी.सी.आय अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर समुहाने हे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे.
फॉर्च्युन तेलाच्या जाहिरातीशी निकट संबंध असलेल्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, गांगुलीने केलेल्या फॉर्च्युन तेलाच्या सर्व जाहिरातींचे प्रक्षेपण थांबवण्यात आले आहे. ओगिल्व्ही ऍण्ड मॅथर या जाहिरातदार कंपनी पुन्हा नवी जाहिरात बनविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षाच्या जानेवारी महिन्यात या तेलाच्या जाहिरातीसाठी सौरव गांगुलीची निवड निश्चित करण्यात आली होती. फॉर्च्युन राईस ब्रान तेलाने हृदयविकाराचा धोका कमी होतो अशी जाहिरात केली जात होती.
बीसीसीआय अध्यक्ष असणाऱ्या सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका नुकताच येऊन गेला. त्यांनतर तातडीने त्याच्यावर ऍन्जिओप्लास्टी करण्यात होती. सौरव गांगुलीवर उपचार करणाऱ्या वुडलॅंड हॉस्पिटल कडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली होती.
सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर लोकांनी कंपनीची सोशल मिडीयावर खिल्ली उडवायला सुरूवात केली. त्याबरोबरच एकूणच कंपनी ज्या व्यक्तिंना घेऊन जाहिरात करते त्या व्यक्ती स्वतः त्या वस्तू वापरतात का? असे प्रश्न उपस्थित केले. यात किर्ती आझाद सारख्या पूर्व क्रिकेट खेळाडूंचा देखील समावेश आहे. किर्ती आझाद यांनी ट्वीटरवरून सौरव गांगुलीसाठी उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा व्यक्त करतानाच या जाहिरातीचा जुना फोटोही ट्वीट केला आहे. (https://twitter.com/KirtiAzaad/status/1345671836554575873)
जाहिरात कंपनीच्या उच्चपदस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सौरव गांगुलीला जाहिरातीसाठी थेट पुन्हा एकदा नियुक्त करणे ही घोडचूक करेल, मात्र तेच नवा संदेश घेऊन केल्यास फायद्याचे ठरेल.
आदनी विल्मार ही गौतम अदानी यांच्या मालकीची कंपनी आहे. विविध खाद्यतेलांबरोबरच ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे साबण आणि सॅनिटायझर्स देखील अदानी अलाईफ या ब्रँड नावाने विकते.