शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील रिसॉर्टवर सक्तवसुली संचलनालय (इडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एकत्रितरित्या धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. काहीवेळापूर्वीच इडी आणि सीबीआयचे अधिकारी याठिकाणी पोहोचले असून याठिकाणी सध्या शोधसत्र सुरु आहे. यापूर्वी ईडीने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. परंतु, नंतर हा तपास काहीसा थंडावला होता. मात्र, आता प्रताप सरनाईक यांच्या रिसॉर्टवर धाड टाकल्यामुळे याप्रकरणात नवी माहिती पुढे येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती. ही चौकशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच भविष्यात आपण ईडीला सहकार्य करण्यासाठीही तयार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते.
तत्पूर्वी ईडीने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी २५ नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची ईडीने कसून चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते.
टॉप्स ग्रुपकडून एमएमआरडीएला १७५ कोटींच्या कंत्राटासाठी ७ कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी २८ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.
हे ही वाचा:
‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?
प्लाझ्मा थेरेपी आता बंद, कारण काय?
मुंबईत अजून २४ तास पावसाची शक्यता
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती
राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून १०० पैकी फक्त ७० टक्के गार्ड्स वापरले जायचे. ३० टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास दीडशेच्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली होती. यापैकी काही वाटा प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ईडीला आहे.