नेदरलँडमधील रॉटरडॅम शहरातील बंदराच्या मुखावर फोटोतही मावणार नाही इतकी मोठी पवनचक्की बसवली आहे. या पवनचक्कीचा व्यास दोन फुटबॉल मैदानांपेक्षा देखील लांब आहे. नंतरच्या काळात येऊ घातलेल्या मॉडलेची उंची पश्चिम युरोपमधील कोणत्याही उंच इमारतीपेक्षा जास्त असेल. अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्यासाठी पवनऊर्जेला प्राधान्य दिले जात आहे.
वाऱ्याचा वेग, दिशा, पात्यांवरील ताण, विजेची निर्मीती यांसाठी या पवनचक्कीवर शेकडो सेंसर्स बसवले आहेत. नेदरलँडमध्ये बसवलेली राक्षसी पवनचक्की जरी केवळ चाचणीसाठी असली तरीही जनरल इलेक्ट्रीकने (जी.ई) अशा अजून अनेक पवनचक्क्या बसवण्याचे नियोजन केले आहे. एकत्रितपणे चालू झाल्यानंतर या पवनचक्क्यांमुळे शहरांना ऊर्जा पुरवणे शक्य होईल. त्यामुळे कोळसा आणि नैसर्गिक वायूंवरील अवलंबित्व कमी होईल.
जी.ईला यापैकी अजून एखादी मोठी पवनचक्की बसवायची आहे. मात्र या क्षेत्रात नव्याने शिरकाव केल्याने कंपनी समोर ते किती गतीने पवनचक्कीची उभारणी करू शकतात, त्यांची कार्यक्षमता किती असेल, अशा प्रकारच्या शेकडो पवनचक्क्या ते बसवू शकतात का असे विविध प्रश्न आहेत.
या अजस्त्र आकारमानाच्या पवनचक्क्यांनी या उद्योगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या क्षेत्रातील धुरीणांपैकी एकाने या संशोधनाला तंत्रज्ञानाची मोठी झेप असल्याचे सांगितले आहे.
ही पवनचक्की या प्रकारच्या रचनांमधील पहिलीच आहे. या पवनचक्कीची क्षमता सध्या कार्यरत असलेल्या सगळ्यात मोठ्या पवनचक्कीपेक्षा तिप्पट आहे. त्यामुळे या उद्योगातील सर्वच गणिते नव्याने मांडायची गरज निर्माण केली आहे.
काही दशकांपूर्वी जेवढ्या ऊर्जा निर्मीतीचा विचारही केला जाऊ शकत नव्हता तेवढी ऊर्जा जी.ईची एक पवनचक्की निर्माण करते. एका पवनचक्कीतून १३ मेगावॅट एवढी विद्युत निर्मीती होते. एवढी वीज १२,००० घरांच्या एका शहराला पुरेशी आहे.
जी.ईच्या सांगण्यानुसार एक पवनचक्की बोईंग ७४७ जेटच्या चारही इंजिनांएवढी शक्तीशाली आहे. समुद्रात मोठ्या आकारमानाच्या पवनचक्क्या बसविणे शक्य असल्याचे लक्षात अल्यानंतर आता पवनचक्क्या तिथेच बसविल्या जातात. या क्षेत्रात आता बरीच प्रगती झाली आहे. डेन्मार्क मध्ये १९९१ मध्ये बसविलेल्या पहिल्या पवनचक्कीपेक्षा जी.ईची एक पवनचक्की ३० पट जास्त ऊर्जानिर्मीती करते. येत्या काही वर्षात आणखी मोठ्या आकारमानाच्या पवनचक्क्या बसविल्या जाण्याची शक्यता आहे. परंतु, एका विशिष्ट आकारमानानंतर त्यातील फायदा कमी होईल. त्यांनतर तेवढ्याच आकारमानाच्या पवनचक्क्या बनवल्या जातील.
मोठ्या आकारमानाच्या पवनचक्क्या अधिक विद्युत निर्मीती करतात. त्यामुळे त्यांच्यापासून अधिक उत्पन्न देखील मिळते. मोठ्या आकारमानाच्या पवनचक्क्या बसवल्यामुळे कमी पवनचक्क्यांत पवनऊर्जा संकुल तयार होते. त्यामुळे ते तुलनेने स्वस्त पडते.