खतरनाक गँगस्टर छोटा राजन याला खंडणी मागितल्या प्रकरणी २ वर्षांची शिक्षा झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयांनी छोटा राजन आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात ही शिक्षा सुनावली आहे. २०१५ सालच्या या खटल्यात राजन आणि त्याचा साथीदारांवर पनवेलच्या नंदू वाजेकर या बांधकाम व्यावसायिकाकडून जबरदस्तीने २६ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.
नंदू वाजेकर या बांधकाम व्यावसायिकाने २०१५ साली पुणे येथे एक जमीन खरेदी केली होती. या सौद्यात परमानंद ठक्कर या दलालाला २ कोटी रुपये रक्कम देण्याचे ठरले होते पण ठक्कर यांना जास्त रकमेची अपेक्षा होती. ही अधिकची रक्कम द्यायला वाजे यांनी नकार दिला तेव्हा ठक्कर यांनी छोटा राजन याला सुपारी देऊन रक्कम वसूल करण्यास सांगितले. या नंतर छोटा राजनने आपल्या माणसांना वाजेकर यांच्या कार्यालयात पाठवून दमदाटी केली आणि २६ कोटी रुपयांची मागणी केली. वाजेकर यांनी पैसे न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. नंदू वाजेकर यांनी स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरून पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी छोटा राजन सोबतच सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम उर्फ दाद्या, सुमित विजय म्हात्रे या तिघांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर सुपारी देणाऱ्या परमानंद ठक्करचा तपास सुरु आहे. नंदू वाजेकर यांच्या कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेज मधून ही गोष्ट स्पष्ट होते कि आरोपी त्यांचा कार्यालयात गेले होते. त्यासोबतच पोलिसांच्या हाती कॉल रेकॉर्डिंग लागले आहे ज्यात राजन हा नंदू वाजेकर यांना धमकावत आहे. छोटा राजन विरोधातले सर्व खटले हे सीबीआय कडे सुपूर्त करण्यात आले आहेत ज्यात या खटल्याचा पण समावेश आहे.