बँकांमध्ये मराठीचा वापर व्हावा म्हणून मनसेने सुरू केलेले आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांना हे आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले. ‘आपला मराठी समाज जर कच खात असेल तर ही आंदोलने कशासाठी करायची’? असा सवाल करत त्यांनी या आंदोलनाला अर्धविराम दिलेला आहे. मराठी समाजाने खरोखरच अशी कच खाल्ली आहे काय, या प्रश्नाचा धांडोळा घेणे आम्हाला गरजेचे वाटते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीका करणाऱ्यांना शिवसैनिक झुंडीने टार्गेट करायचे. हे तथाकथित मर्द एकेका माणसाला दहा-बारांच्या टोळक्याने गाठायचे, त्याला मारझोड करायचे. असे सर्रास चालले होते. मग या मर्दांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला जायता. कारण कर्तृत्त्व किती मोठे? एका माणसाला झुंडीने बदडले. हे सरकार आज अस्तित्त्वात नाही. परंतु त्यांच्या त्या मर्दानगीचे किस्से मात्र लोक कधीही विसरणार नाहीत.
महायुती सरकारच्या काळात मनसेच्या आंदोलनाच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा पाहण्याचे भोग महाराष्ट्राच्या नशिबी आले. या झुंडी कडून मार खाणारी मंडळी सर्वसामान्य, कोणतेही कवच नसलेली, पोटापाण्यासाठी काम करणारी. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आले पाहिजे, हा आग्रह मान्य आहे. मनसेचे कार्यकर्ते हा विचार अमलात आणण्यासाठी जी पद्धत वापरतात ती समर्थनीय नाही. कारण राज ठाकरे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असे वागताना दिसत नाहीत.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने राज ठाकरे यांच्या पक्षाने एका भव्य कार्यक्रमाचे आय़ोजन केले होते. या कार्यक्रमात जावेद अख्तर, विकी कौशल, सोनाली बेंद्रे, आशुतोष गोवारीकर, रितेश देशमुख अशा दिग्गजांनी सहभाग घेतला. मराठी भाषेच्या प्रेमाखातर कार्यक्रमात सहभागी झालेल्या जावेद अख्तर यांनी हिंदीमध्ये केलेल्या भाषणात मायमराठीचा, मराठी संस्कृतीचा गौरव केला.
हे ही वाचा:
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा!
सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांच्या व्हिसावर घातली बंदी; कारण काय?
मुलीला रस्त्यात छेडले, कर्नाटकचे गृहमंत्री म्हणतात, अशा घटना घडत असतात!
“टीम इंडियातून बाहेर – पण आयपीएलमध्ये फायर!”
जावेद अख्तर हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. उर्दू, हिंदी साहित्यातील त्यांचे योगदान मोठे आहे. कवि, लेखक, पटकथाकार, गीतकार अशा विविध भूमिकेत ते लीलया वावरलेले आहेत. त्यांना मराठी बोलता येत नसले तरी मराठीचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिला ही बाब छोटी
नाही. त्यांना मराठी बोलता येत नाही, परंतु तिथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सैनिकांनी ना त्यांना दरडावले, ना त्यांना थोबडवले, ना सार्वजनिकरित्या त्यांची अब्रु काढली. सगळे जण त्यांच्या भाषणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत होते.
विख्यात फूड ब्लॉगर कामिया जानी ज्यांचा कर्ली टेल हा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे, त्या विधानसभा निवडणुकी दरम्यान राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. राज ठाकरे यांनी त्यांच्यासोबत मराठी खाद्यसंस्कृतीबाबत
अभिमान व्यक्त करत छान गप्पा मारल्या. परंतु सगळा संवाद हिंदीत झाला. कामिया जानी यांना बहुधा मराठी बोलता येत नसावे, त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांना सांभाळून घेतले. कर्ली टेलचा हा एपिसोड हजारो मराठी जनांनी पाहिला, त्यांना यात काहीही वावगे वाटले नाही. कामिया जानी यांना मराठीत बोलता येत नाही, म्हणून त्या महाराष्ट्रद्रोही आहेत, असा काही ट्वीट मनसेचे फायरब्रँड नेते संदीप देशपांडे यांनी केल्याचे आम्हाला आठवत नाही. त्यांनी कामिया जानी यांच्याशी आपण मराठीतून का बोलला नाहीत, असा जळजळीत सवाल राज ठाकरेंना केला असेल की नाही, याबाबतही आम्हाला काही माहिती नाही.
अभिनेते कुणाल विजयकर यांचा खाने मे क्या है… हा कार्यक्रमही चवदार खानपानाला समर्पित आहे. त्यांच्या हिंदी कार्यक्रमात राज ठाकरे सहभागी झाले, दोघेही मराठी असल्यामुळे त्या हिंदी कार्यक्रमात दोघेही मराठी बोलत होते. हा एपिसोड प्रचंड लोकप्रिय ठरला. याचा अर्थ जिथे मराठी बोलणे शक्य आहे, तिथे राज ठाकरे मराठीत बोलले, जिथे शक्य नाही तिथे त्यांनी हिंदी संवाद साधला. राज ठाकरे यांचे हिंदी सिनेमासृष्टीत अनेक मित्र आहेत. सलमान खान, आमिर खान, गोल्डी बहल असे बरेच. ही मंडळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर येत असतात, अनेकदा राज ठाकरेही त्यांच्याकडे गप्पा मारायला जात असतात. हा संवाद हिंदीमध्येच होत असणार. बरं त्यात कोणालाही काही वावगे वाटत नाही.
सलमान, आमिर खानने महाराष्ट्र द्रोह केला, असे राज ठाकरे यांना कधीही वाटत नाही. किंवा मराठी येत नाही, म्हणून राज ठाकरे यांनी त्यांची कधी बेअदबी केली, त्यांच्या मुस्काटात भडकावली असेही कोणी ऐकलेले नाही.
त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या नेत्याकडून हा दिलदारपणा शिकायला हवा. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला मराठी आले पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही. परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाने मायमराठीवर प्रेम केले पाहीजे. ही भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु येत नसेल तो मराठीद्रोही होत नाही, त्याला महाराष्ट्राबाहेर चालते व्हा असे सांगणे हा महाराष्ट्र धर्म नाही. हे किमान राज ठाकरे यांच्या उदाहरणावरून तरी महाराष्ट्र सैनिकांनी शिकायला हवे.
परराज्यातील लोक मोठ्या संख्येने महाराष्ट्रात नोकरी करतायत, त्यातल्या अनेकांना मराठी समजते पण बोलता येत नाही. कर्नाटकातील बंगळुरू असो किंवा हैदराबादमधील आयटी इंडस्ट्री काम करणाऱ्या मराठी तरुणांची हीच समस्या आहे. त्यांना तिथली स्थानिक भाषा येत नाही, म्हणून त्यांना तिथल्या लोकांनी बडवले तर तामिळ, तेलगू भाषेला बळ मिळणार आहे काय? या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे नाही असे आहे.
दक्षिणेतील राज्यातील नेत्यांनी भाषेला राजकीय हत्यार बनवले आहे. हिंदीचा दुस्वास करायचा आणि इंग्रजीला मिठ्या मारायच्या असा प्रकार तिथे झाला. हिंदीचा दुस्वास करून स्थानिक भाषेचे काही भले होत नाही. आपल्याकडे जशा मराठी शाळा बंद होतायत, तशा तिथे स्थानिक तामिळ, तेलगू, कन्नड शाळा बंद होत चालल्या आहेत. इंग्रजी मात्र बहरते आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका केली म्हणून झुंडीने जाऊन लोकांना बडवणारे, त्यांची सार्वजनिक ठिकाणी नाचक्की करणारे आणि मराठी येत नाही, म्हणून झुंडीने जाऊन लोकांना बडवणारे यांच्यात फरक नाही. मराठीचा आग्रह धरण्याची हीच पद्धत असेल तर आमिर खान, सलमान खान, जावेद अख्तर यांच्यासारख्या प्रस्थापितांना सुद्धा महाराष्ट्र सैनिकांना तोच निकष लावला पाहीजे.
काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची फोटोबायोग्राफी प्रकाशित केले होती. त्याच्या प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम झाला होता. या सोहळ्याला हिंदी सिने इंड्रस्ट्रीचे शहंशाह अमिताभ बच्चन उपस्थित होते. या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी दिलेले निमंत्रण मराठीतून होते की हिंदीतून याचा विचार एकदा महाराष्ट्र सैनिकांनी करून पाहावा.
जर दिग्गजांच्या बाबतीत दंडेली करता येत नसेल तर पोटासाठी आठ तास राबणाऱ्या कवचहीन मध्यमवर्गीय लोकांसोबतही ती करू नये. सगळ्यांना एक न्याय हवा. बाकी हे आंदोलन मागे घेतल्याबद्दल राज ठाकरेंचे अभिनंदन. अशी आंदोलने खपवून घेणाऱ्या महायुती सरकारचेही अभिनंदन.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)