कोविड-१९ च्या लसीमुळे माणूस नपुंसक होऊ शकतो, असे बाष्कळ विधान समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केले आहे. हे विधान करताना त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या कोविड लस न घेण्याच्या निर्णयाची पाठराखण केली आहे. मिर्झापूर जिल्ह्यातील आशुतोष सिन्हा हे समाजवादी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत.
“अखिलेश यादव जर लस घेणार नाहीत असं म्हणाल्येत तर त्यात नक्कीच काहीतरी गंभीर आहे. आमचा सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही. अखिलेश यादव यांनी तथ्यांच्या आधारे विधान केले आहे. जर ते लस घेणार नसतील तर नक्कीच त्या लसीत असे काहीतरी असेल जे धोकादायक आहे. उद्या लोकं म्हणतील ही लस
लोकांना मारायला किंवा लोकसंख्या कमी करायला दिली गेली. तुम्ही नपुंसक पण होऊ शकता. काहीही घडू शकते. ” असे विधान सिन्हा यांनी केले आहे.
“जर अखिलेश यादव लस घेणार नसतील तर राज्यातील कोणीही लस घेऊ नये” असेही सिन्हा म्हणाले.
नपुंसकत्वाच्या अफवा निव्वळ मूर्खपणाच्या…
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे डॉ.व्ही.जी.सोमाणी यांनी कोविड लस पूर्णतः सुरक्षित असून नपुंसकत्वाच्या अफवा फेटाळल्या आहेत. “आम्ही अशा कोणत्याच गोष्टीला मान्यता देणार नाही जिथे सुरक्षा विषयक शंकेला वाव आहे. लस ही १००% सुरक्षित आहे. थोडा ताप येणे, अंगदुखी, ऍलर्जी, यांसारखे साईड इफेक्ट्स हे सगळ्याच लसींमध्ये आढळतात. पण यामुळे लोक नपुंसक होतील असे म्हणणे हे निव्वळ मूर्खपणाचे आहे.”
३ जानेवारीच्या रविवारी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रविवारी दोन भारतीय लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली होती