स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. राज्यात या प्रकरणामुळे वातावरण तापलेले असताना कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या दाखल केलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स मंगळवारी कुणाल याला पाठवण्यात आले होते. मात्र, कुणाल कामरा या चौकशीसाठी हजर राहिला नाही. यानंतर आता पोलिस कुणाल याला पुन्हा एकदा समन्स पाठवणार असल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विनोदानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसनेचे नेते, शिवसैनिक संतापले असून त्यांनी निषेध म्हणून कुणाल कामराचा शो झाला त्या हॉटेलमध्ये घुसून शो च्या सेटची तोडफोड केली. सोमवारी दिवसभर या प्रकरणामुळे राज्यातलं वातावरण तापलेलं होतं, तर विधानसभेतही याचे पडसाद उमटले.
कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स कुणाल याला पाठवण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर कुणाल कामरा हा महाराष्ट्राबाहेर गेल्याचे बोलले जात आहे. खार पोलिसांचे एक पथक सोमवारी कुणाल कामराच्या घरी गेले होते. तिथे त्याचे आईवडील राहत असल्याने समन्सची एक कॉपी घरी देण्यात आली. यानंतर कुणाल कामरा याने एक आठवड्याची मुदत मागितली होती मात्र ही मागणी फेटाळून लावण्यात आली. यानंतर आता मुंबई पोलिस बुधवारी स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा यांना दुसरे समन्स जारी करण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराने त्याच्या वकिलामार्फत एका आठवड्यानंतर पोलिसांसमोर हजर राहण्याची विनंती फेटाळल्यानंतर हे घडले. आता भारतीय न्याय संहिताच्या (बीएनएस) कलम ३५ अंतर्गत कुणाल कामरावर दुसरे समन्स जारी केले जाण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा..
फडणवीस यांच्या उपस्थितीत भारताचा पहिला कीर्तन रिअॅलिटी शो लॉन्च
विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे
प्राथमिकता क्षेत्र कर्ज मार्गदर्शक तत्त्वांमधील सुधारणा अर्थव्यवस्थेला चालना देईल
तुंगनाथ मंदिर मार्गावर जखमी युवकाचा यशस्वी बचाव केला
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराला इशारा देत माफीची मागणी केली. कुणाल कामरा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल काही म्हणणे नसून ते स्वैराचाराकडे जाणारे नसावे, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.