बीडमधील सतीश ऊर्फ खोक्या भोसले याला पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अटक केली. यानंतर त्याला बीडमध्ये आणण्यात आले. खोक्या भोसले हा आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. बीडमध्ये त्याला आणल्यानंतर शिरूर येथे न्यायालयात हजर करण्यात आले होते. अखेर न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. या संदर्भात पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, खोक्या हा काही दिवसांपासून फरार होता. अखेर प्रयागराज येथून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर शुक्रवारी खोक्या याला शिरूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपासासाठी, हत्यारे तसेच पुरावे गोळा करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. यावेळी न्यायालयाने भोसले याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले याने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य मिळाले होते.
हे ही वाचा :
इंझमाम उल हक म्हणतो, आयपीएलवर बहिष्कार टाका!
बांगलादेशचे राजदूत म्हणतात, युनूस सरकारमुळे देशात अराजक, हिंदूंवर अत्याचार
मणिपूरमध्ये पोलिसांना मोठे यश, चार दहशतवाद्यांना अटक!
संभलमध्ये उत्साहात होळी, कडक सुरक्षा, ड्रोनच्या मदतीने नजर
दरम्यान, वनविभागाने खोक्या याच्या घरावर बुलडोझर कारवाई केली आहे. वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं. त्यामुळे आता वनविभागाने ही कारवाई केली. या आधी वनविभाने नोटीस पाठवली होती. पण ४८ तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे.