महायुती 2.0 च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. गेल्या काही वर्षांच्या परंपरेचे पालन करत विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाकडे कोणतीही
नवी रणनीती नाही. जुनी बाटली, जुनी दारु. सत्ताधारी पक्षातील विसंवादावर ते जास्त अवलंबून आहेत. मविआतील विसंवादामुळे जसे त्यांचे सरकार कोसळले तसे महायुतीतील कथित विसंवादामुळे विद्यमान सरकार कोसळेल, असे त्यांचे
प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह काल रविवारी घेतलेल्या पत्रकार परीषदेत एक है तो सेफ है… हेच चित्र दिसल्यामुळे तूर्तास तरी विरोधकांच्या अपेक्षेवर पाणी पडलेले दिसते आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली भेट आणि त्या भेटीत झालेला कथित संवाद रंगवून सामनाकार संजय राऊत यांनी रोखठोक या स्तंभातून शिंदे आणि फडणवीसांमधून विस्तव जात नाही, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी शिंदे दिल्लीत अमित शहा यांना भेटले तेव्हा मी सुद्धा सोबत होतो असे स्पष्ट करून अजित पवारांनी त्यावर पाणी ओतले आहे.
एका पक्षातील दोन नेत्यांमध्ये किती पराकोटीचा विसंवाद असू शकतो हे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत असताना अनुभवले आहे. त्या काळात आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्याकडून आलेल्या अनुभवांमुळे ते शिवसेनेतून बाहेर पडले. आज ते एका पक्षाचे नेते आहेत. महायुती सरकारमध्ये आज ते ज्यांच्यासोबत आहेत, त्या भाजपा आणि राष्ट्रवादीशी थोडेफार मतभेद असणे अत्यंत स्वाभाविक आहे. हे मतभेद सांभाळून एकत्र चालण्याची कला अवगत असली की मतभेदांचे तडे भविष्यात भगदाडांमध्ये बदलत नाहीत. ‘हलक्यात घेऊ नका’, हे माझे विधान काही काळापूर्वी मी ज्यांची टाका-पट्टी केली त्यांनाच उद्देशून केले होते, असा खुलासा शिंदे यांनी केला आहे. त्यांचा इशारा उबाठा शिवसेनेकडे होता.
जनतेने महायुतीला दिलेला जनादेश एकत्र राहण्यासाठी आहे. तो पायदळी तुडवला तर जनता पुढच्या निवडुकीत आपल्याला तुडवेल याची जाणीव या महायुतीच्या नेत्यांना निश्चितपणे आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा जनादेश हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मिळालेला आहे. एक है तो सेफ है… बटेंगे तो कटेंगे… साठी दिलेला हा जनादेश आहे. बटेंगे तो कटेंगे…चा अर्थ एकनाथ शिंदे यांनाही ठाऊक आहे. निवडणुकीतील पराभवानंतरही विरोधी पक्षांची तुष्टीकरणाच्या राजकारणावरील निष्ठा कमी झालेली नाही. अशा परिस्थितीत हिंदुत्वावर निष्ठा बाळगणाऱे पक्ष मजबूतीने एकत्र राहणे ही काळाची गरज आहे.
महायुती १.० सरकारच्या काळात मराठा आरक्षणामुळे तापलेल्या वातावरणावर विरोधकांची भिस्त होती. दुसऱ्या बाजूला दलितांना संविधानाच्या मुद्द्यावर भडकवायचे आणि मुस्लीम मतपेढीला विविध आश्वासनांचे गाजर दाखवून आपल्याकडे वळवायचे, अशी रणनीती होती.
विधानसभा निवडणुकीत या रणनीतीचा बाजार उठला. तरही महायुती २.० सरकारमध्ये हीच रणनीती कायम ठेवली जाणार असे दिसते आहे. मुस्लीम मतपेढीला खूष करण्यासाठी शेण खाण्याचीही विरोधकांची तयारी आहे. छावा या सिनेमाच्या निमित्ताने याची झलक पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी शपचे आमदार रोहित पवार यांनी पक्षाचा ब्राह्मण विरोधी एजेंडा पुन्हा एकदा रेटला आहे. औरंगजेबाला क्लीनचिट दिली की मुस्लीम खूष होतात, असा समज बहुधा त्यांनी करून घेतला आहे. हिंदूंच्या नाराजीची त्यांना फारशी फिकीर दिसत नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने केलेला छळ त्यांना मनुस्मृतीशी आणि ब्राह्मणांशी जोडून टाकला आहे. म्हणजे जेमतेम साडे तीन टक्के असलेल्या ब्राह्मणांना टार्गेट करण्याचा मनसुबा त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलेला आहे.
हे ही वाचा:
दिल्लीतील विजेच्या पायाभूत सुविधांची वाईट स्थिती आम आदमी पार्टीमुळे
विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे
फसवणूक झालेल्या हिंदू तरुणीची सुखरूप सुटका
नजरकैदेत ठेवून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले
छत्रपती संभाजी महाराजांना अंतिम समयी भोगलेल्या हाल अपेष्टांना नराधम औरंगजेब जबाबदार नसून ब्राह्मण जबाबदार होते, असे तर्कट एखाद्या नासलेल्या मेंदूतूनच येऊ शकते. जर हे सत्य असेल तर गुरु तेग बहाद्दूर, गुरु गोविंद सिंहांचे चार साहीबजादे, बंदा बैरागी, यांच्यासारख्या अनेकांच्या क्रूर हत्यांनाही मनुस्मृती कारणीभूत होती, हे एकदा रोहित पवार यांनी जाहीर करावे म्हणजे त्यांच्या राजकारणाचे काय करायचे याचा फैसला हिंदू समाज करून टाकेल. हे बरे झाले की मुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावरच चालले आहोत, आणि जी मंडळी औरंगजेबाच्या महालाच्या जीर्णोद्धाराची भाषा करतात, अफजल खानाला सुफी संत म्हणतात, त्यांनी आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये या शब्दात त्यांना ऐकवले आहे.
रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे, हिंदू समाजाच्या भावनांबाबत राष्ट्रवादी शपचे शेपूट वाकडेच आहे. काँग्रेसची भूमिकाही काही वेगळी नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी पक्षांना आपल्या कक्षा विस्तारायच्या असतील तर एकमेकांवर कुरघोड्या करण्यापेक्षा त्या काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शपच्या प्रांतात विस्तारल्या पाहिजेत. भ्रष्टाचाराची वाळवी लागलेल्या प्रशासनाला सुधारण्यासाठी जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामाणिक प्रयत्न करत असतील, तर त्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची साथ मिळाली पाहिजे. विरोधी पक्ष सरकारसोबत सुसंवाद साधायचा आहे, असा दावा करतात आणि
सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहीष्कार घातलात, या दुहेरी भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवले. विरोधी पक्षांचा सरकार सोबत संवाद किंवा सुसंवाद कितपत ठेवतो, हा प्रश्न महत्वाचा आहे, परंतु तेवढा महत्वाचा नाही जेवढा महायुतीत सहभागी असलेले तीन पक्ष एकमेकांशी सुसंवाद किती ठेवतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नांतून अस्तित्वात आलेली भाजपा-शिवसेना युती २५ वर्षे टिकली. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या प्रयत्नांनी नव्याने झालेली ही युती अशीच मजबुतीने टिकवायची असेल तर सुसंवादा टीकवायलाच हवा.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)