दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने आयोजित केलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्याच्या चर्चेपेक्षा भलत्याच कारणांनी गाजते आणि वाजते आहे. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पैशांचा वापर करून ही शाही संमेलने भरवली जातात. त्यात राजकीय नेत्यांची उठबस असणारच. त्यामुळे ही संमेलने साहित्यप्रेमींची चळवळ न बनता, राजकीय चिखलफेकीचा अड्डा, तमाशाचा फड बनला आहे. तमाशातील हे सवाल जवाब वाचकांचे उद्बोधन करण्यात अपयशी ठरत असले तरी मनोरंजनात मात्र कणभर कमतरता आलेली नाही.
आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, पु.भा.भावे, गो.नी.दांडेकर, व.पु.काळे, ना.सी.फडके, नारायण सुर्वे, दुर्गा भागवत, इंदिरा संत या आणि अशा अनेक दिग्गज साहित्यिकांना वाचकांचे जे प्रेम मिळाले, जी कीर्ती मिळाली ती अलिकडे किती लेखकांना लाभते? किती लेखक किंवा कवी असे आहेत, जे एखाद्या कार्यक्रमात येणार आहेत, असे म्हटल्यावर सभागृह खच्चून भरत?
अलिकडे एखादा लेखक संमेलनाच्या अध्यक्षपदी आला आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, भाजपाच्या विरोधात, संघाच्या विरोधात काही तरी बरळतो. त्यानंतर माध्यमांमध्ये जी काही चर्चा घडते, त्यामुळे लक्षात येते कि अमुक तमुक व्यक्ति लेखक किंवा लेखिका आहेत. तोपर्यंत त्यांचे लेखन काय नावही लोकांना ठाऊक नसते. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात ही मंडळी काय बदल घडवतात? माय मराठीचा मान किती वाढवतात? हे प्रश्न तर खूप दूर राहिले.
अशी ढीगभर उदाहरणे आहेत. मग ते फ्रान्सिस दिब्रिटो असो, श्रीपाल सबनीस असो, किंवा डॉ.तारा भवाळकर सगळेच एका माळेचे मणी. दिब्रिटोंची चर्चा त्यांच्या साहित्यापेक्षा धर्मांतरासाठी जास्त होती. सध्या चर्चेत असलेल्या समेंलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानावरून त्यांना लक्ष्य केले. ‘माझा जन्म जैविक नाही, म्हणणाऱ्यांवर तुम्ही किती विश्वास ठेवाल?’ असा सवाल भवाळकरांनी केला. असं काही तरी बोललात तर मीडियावाले अमुक तमुक यांनी ‘खडे बोल’ सुनावले म्हणून लगेच डोक्यावर घ्यायला तयार असतात. आपण ज्याला आग्रहाने निमंत्रित केले आहे, अशा पाहुण्याचा अनादर करायचा नसतो, एवढे सामान्य ज्ञान भवाळकरांना नसावे, ही आश्चर्याची बाब आहे.
ज्या संमेलनाचे स्वागताध्य़क्ष शरद पवार राजकारणातील आद्य खंजीर खुपशे, भ्रष्ट म्हणून अलम दुनियेत प्रसिद्ध आहेत, त्यांच्यावर वर तमाम लेखक मंडळी स्वागताध्यक्ष म्हणून विश्वास ठेवू शकता, पण मोदींवर विश्वास ठेवायला तुम्हाला अडचण असते. बरं तुमच्या मताचा लोकांच्या मनावर कितीपत परीणाम होता? तर शून्य, कारण इतका दांभिकपणा ज्यांच्यात मुरलेला आहे, त्यांच्यावर लोक का विश्वास ठेवतील ? लोकांचा मोदींवर विश्वास आहे, म्हणून ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले, हेही भवाळकरांना कळू नये? की जनता मूर्ख आणि अकलेचा ठेका आपणच घेतलेला आहे, असा भवाळकरांचा गैरसमज आहे.
भंपकपणा किती असावा, काही बोलू नका म्हणून मला दम देण्यात आला आहे. असा दम घेऊन तुम्ही स्वीकारलेत कशाला अध्यक्षपद? की मिरवायचा सोस तुम्हाला आवरत नव्हता? भवाळकरांनी मोदींबाबत शेलके विधान केले, परंतु महाराष्ट्राच्या बरबटलेल्या राजकारणाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या शरद पवारांबाबत त्यांच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. कारण लेखकांची संमेलनांची हौस पुरवण्यासाठी शरद पवार पैसा पुरवतात, त्यांना कसे बोलायचे असा प्रश्न त्यांना पडलेला असावा. एखादे शेलके विधान भवाळकरांनी पवारांबाबतही केले असते, तर त्यांना एकूणच राजकारण आणि राजकीय व्यक्तिमत्वाबाबत चीड असल्याचे स्पष्ट झाले असते. परंतु एकूणच ही साहित्यिक मंडळी निवडणक संवेदनशीलतेबाबत प्रसिद्ध आहेत, तेच भवाळकरांनी केले.
ही संमेलने म्हणजे तमाम समाजवादी आणि लिब्रांडूंचा अड्डा झालेला आहे. एरव्ही ही मंडळी त्यांच्या कंपूमध्ये जी जळजळ आणि हळहळ व्यक्त करत असतात, ती या संमेलनाच्या निमित्ताने जाहीरपणे व्यक्त करण्याची संधी मिळते. आणखी एका अतिशहाण्या लेखकाने एका परिसंवादात ‘पूर्वी राम राम म्हणणारा महाराष्ट्र आता जय श्रीराम बोलतो आहे’, एका वर्तमान पत्राच्या मथळ्यात या सवालाला बोचरा सवाल म्हटलेले आहे. आम्ही म्हणतो हा भिक्कारडा सवाल आहे, कर्मदरिद्री सवाल आहे. कोणी जय श्रीराम म्हणत असेल तर तुमच्या बापाचे काय जाते आहे? तुम्ही बोलू नकोस, कोणी काय बोलावे, हे ठरवणारे तुम्ही कोण? की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेवर अघोषित हुकूमशाही लादली आहे. श्रीराम आमचे आराध्य आहे, ज्यांची रामावर निष्ठा आहे, त्यांनी राम राम बोलावे की जय श्रीराम बोलावे, तुमच्या बुडाला आग का लागते?
या संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातले हे असे कर्मदरिद्री एकत्र येतात आणि आपली अक्कल पाजळत असतात. यांची सामाजिक बांधिलकी काय असते? आयुष्यात एका तरी गरीबाच्या घरातला अंधार दूर करण्यासाठी यांना काही केले आहे का? एका तरी कमजोर माणसाचा ही मंडळी आधार बनली आहेत का? पुलंनी लिखाण करून मिळालेला बराच पैसा
सामाजिक संस्थांना दान केला. मुळात लेखन करून अर्थार्जन करण्या इतपत यांच्या लेखणीत दमच नाही. दान काय कपाळ करणार? असे हे भंपक लोक आणि या भंपकांचा तमाशा म्हणजे हे साहित्य संमेलन. विधान परीषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्या एका विधानावरून जोरदार राजकीय राडा सुरू झालेला आहे. उबाठा सेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळते, असा दावा गोऱ्हे यांनी एका परिसंवादात केला आहे. गंमत म्हणजे परिसंवादाचे नामकरण आम्ही असे घडलो, असे होते. बहुधा हे गोऱ्हे यांच्या लक्षात आल्यामुळे मला मर्सिडीज द्याव्या लागल्या नाहीत, असा खुलासा त्यांनी केला.
हे ही वाचा:
‘छावा’ची ३०० कोटींची गगनभेदी गर्जना!
कॉलेजमधून परतत असताना विद्यार्थिनीवर बलात्कार
महाकुंभबद्दल अफवा : ३१ सोशल मीडिया खात्यांविरोधात एफआयआर
आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ?
गोऱ्हेंचे आरोप खरे खोटे, हा इथे मुद्दाच नाही. ठाकरेंच्या सेनेत पदांचा बाजार कोणी सुरू केला, कसा सुरू झाला, याचा तपशील मी अलिकडेच एका व्हीडीयोमध्ये केलेला आहे. मुद्दा हा आहे, की साहित्य संमेलनाचा मंच हा काही उखाळ्या पाखाळ्या काढण्याचा मंच नाही. की राजकीय आखाडा सुद्धा नाही. गोऱ्हे यांना दोष का द्यावा? संमेलनाच्या अध्यक्षांना जर ज्यांना आग्रहाने संमेलनात बोलावण्यात आले आहे, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोमणा मारण्याचा मोह होत असेल तर गोऱ्हे यांना राजकीय चिखलफेक कऱण्याचा परवाना आपल्याला मिळालाय असे वाटणे स्वाभाविक नाही का?
थोडक्यात काय चिखल तुडवणे हेच या संमेलनाचे फलित आहे. भपकेबाज संमेलन करण्यासाठी राजकीय नेत्यांचा गोतावळा जमवायचा, त्यांचे पैसे वापरायचे. मेजवान्या झोडायच्या मिरवायचे आणि त्यांनाच शिव्या घालायचा. सामनाचे कार्यकारी संजय राऊत यांच्यावर आम्ही शंभरवेळा टीका केली आहे. परंतु त्यांच्या एका विधानाशी आम्ही सहमत आहोत. हे दलालांचे संमेलन आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)