महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेत टिपणी करणाऱ्यांवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील आकाश शिंदे नामक एका युवकाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण हा गुन्हा नोंदवताना काही लोकांची नावे मुद्दाम गोवली गेल्याचे म्हटले जात आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार आकाश शिंदे याने ४ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट लिहील्या प्रकरणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करत भावना दुखावणाऱ्या तसेच सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या काही लोकांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत नाना पंडीत, वैभव पाटील, महेश गहूडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदिप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटिल, मुकेश जाधव, स्वरूप भोसले आणि इतर या समाजमाध्यम वापरकर्त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर राजकारण महाराष्ट्राचे, कोमट बॉईज अँड गर्ल्स, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब या फेसबूक ग्रुप्सचा उल्लेख करण्यात आला आहे.
या तक्रारीत उल्लेख केलेल्यांपैकी काही जणांच्या पोस्ट आक्षेपार्ह असल्या तरी काही जणांकडून आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यापैकी आक्षेपार्ह पोस्ट करून राष्ट्रपुरूषांची बदनामी करणाऱ्या स्वरूप भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा:
नरी कॉन्ट्रॅक्टर यांनाही लसीकरणाच्या अव्यवस्थेचा बसला फटका
युरेनियम चोरी प्रकरणात एनआयएची एन्ट्री
लसीकरण हा एकच उपाय,टाटा ग्रुपचं मत
सोनोवाल यांनी हिंमताना दिल्या शुभेच्छा
या गुन्ह्यात नाव असलेल्यांपैकी एक जयसिंग मोहन यांच्याशी ‘न्यूज डंका’ ने बातचीत केली. तेव्हा आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्यात आले असल्याचे मोहन यांनी म्हटले आहे.
“मी कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह लिहिलेलं नाही, अथवा मॉर्फिंग ही केलं नाही, ना महापुरुषांबद्दल टिप्पणी केली, ना राजकीय नेत्यांवर खालच्या थरात भाषेचा प्रयोग केला. मला ह्यात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे, केवळ राजकिय आकसापोटी. मी निर्दोष आहे हे न्यायलायात सिध्द होईलच, परंतु कुठलीही शहानिशा न करता माझ्यावर ती कलमे का लावण्यात आली? स्वरूप भोसले नामक व्यक्तीने महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिहिले आहे व त्याला अटक ही करण्यात आली आहे. आम्हाला सन्माननीय न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. योग्य तो न्याय निवाडा होईल. माझा ह्या प्रकरणाशी काडीमात्रही संबंध नाही.” अशी प्रतिक्रिया जयसिंग मोहन यांनी ‘न्यूज डंका’ शी बोलताना दिली.