‘शिवसेनेने भ्रष्टाचार शिरोमणी सोनियांची तळी उचलणे स्वाभाविकच’ असे म्हणत भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेकडून गांधी-नेहरू कुटुंबांची भलामण करण्यात आल्यानंतर भातखळकरांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकर यांचा दाखला देत भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले.
मुख्यमंत्री पदासाठी अडून राहिलेल्या शिवसेनेने राजकीय तडजोड करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. महाविकास आघाडीचा प्रयोग करत सत्तेत आल्यानंतर शिवसेनेचा सूर बदलून काँग्रेस, राष्ट्रवादीची आणि त्यांच्या नेत्यांची भलामण शिवसेनेकडून रोज करण्यात येते. ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राच्या माध्यमातून शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात असतात. अशातच आता शिवसेनेकडून पुन्हा एकदा गांधी नेहरू परिवाराची भलामण करण्यात आली आहे. गांधी नेहरू परिवारामुळे हा देश तग धरून आहे. त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळेच आपण टिकून आहोत. आधीच्या नेहरू,इंदिरा गांधी, मनमोहन सिंह यांच्यासारख्या पंतप्रधानांनी गेल्या ७० वर्षांत तयार केलेल्या व्यवस्थेमुळे देश यापेक्षाही कठीण काळात टिकून राहिला. असे शिवसेनेने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर टीका करताना शिवसेनेने गांधी नेहरू कुटुंबाच्या कौतुकाचे मनोरे रचले आहेत.
हे ही वाचा:
कोविडविरोधात डीआरडीओचे ‘अस्त्र’
४६ वर्षांनंतर आणखी एक पारसी खेळाडू टीम इंडियाचा भाग
कोविड रुग्णांना भारतीय बनावटीच्या ‘वायुपुत्रा’ची साथ
शिवसेनेच्या याच टीकेला भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “ज्या गांधी-नेहरू परिवाराला शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर यथेच्छ झोडले त्यांचे चरण-चाटण आणि मोदींवर आगपाखड सामनाच्या अग्रलेखात नित्यनियमाने केली जातेय.” असे भातखळकर म्हणाले आहेत तर “कोरोनाच्या संकटात फक्त टक्केवारीची काळजी वाहणाऱ्या शिवसेनेने भ्रष्टाचार शिरोमणी सोनियांची तळी उचलणे स्वाभाविकच नाही का?” असा घणाघातही त्यांनी केला आहे.
ज्या गांधी-नेहरू परिवाराला शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर यथेच्छ झोडले त्यांचे चरण-चाटण आणि मोदींवर आगपाखड सामनाच्या अग्रलेखात नित्यनियमाने केली जातेय.
कोरोनाच्या संकटात फक्त टक्केवारीची काळजी वाहणाऱ्या शिवसेनेने भ्रष्टाचार शिरोमणी सोनियांची तळी उचलणे स्वाभाविकच नाही का? pic.twitter.com/xavuGOvayc— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 8, 2021