महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात अनेक प्रश्न भेडसावत असले तरी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचे कर्तेकरविते शरद पवार यांना हॉटेल-रेस्टॉरन्ट, परमीटबार आणि आदरातिथ्य उद्योगातील व्यावसायिकांची चिंता सर्वाधिक सतावत आहे. या क्षेत्रातील व्यावसायिकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी पवारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मराठा आरक्षणाबद्दल पवार काय बोलतात याबद्दल उत्सुकता असताना बार मालकांचा बसलेला धंदा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी पवारांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना विनंती करणारे पत्र लिहिले आहे.
हे ही वाचा:
मोदी निंदा करणाऱ्या सोरेनना जगन मोहननी झापले
परदेशातून महाराष्ट्राला मिळालेल्या मदतीबद्दल मविआत मतभेद
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे विमा संरक्षण अधांतरीच
या व्यावसायिकांना करभरणा करताना सूट मिळावी किंवा वीजबिलात सवलत मिळावी,अशी मागणी पवारांनी या पत्रात केली आहे. सर्वसामान्य लोकांच्या वीजबिलात सवलत मिळण्यासाठी लोकांची ओरड होत असते तरीही त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते. तिथे सरकारने हॉटेल व्यावसायिकांच्या वीजबिलात सवलत देण्याचा विचार करावा अशी मागणी पवारांनी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
शरद पवार यांनी या पत्रात नमूद केले आहे की, एफल-३ परवानाधारक हॉटेल-परमीटबार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान चार हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. तसेच वीज बिलात सवलत मिळावी. तसेच या व्यावसायिकांच्या मालमत्ता करातही सूट मिळावी अशी मागणी पवारांच्या या पत्रात आहे.
महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या धर्तीवर उद्योगव्यवसायाला संजीवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी अशीही अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे. एरवी केंद्राकडे प्रत्येक गोष्टासाठी बोट दाखविणारे राज्य सरकार या विनंतीमुळे आता केंद्राप्रमाणेच अशी एखादी योजना आणणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.