मुंबईतल्या देवधर स्कूल ऑफ म्युझिकमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरविणारे वनराज भाटिया यांनी आपल्या पुढील सांगीतिक वाटचालीत एक मोठा अवकाश व्यापून टाकला. शुक्रवारी वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले आणि त्यांचा हा अफाट सांगीतिक प्रवास उलगडून समोर आला. लहान वयातच त्यांनी चायकोव्हस्की यांच्या पियानोचा सोहळा पाहिला आणि ते भारावून गेले. तेव्हापासून पाश्चिमात्य संगीतात त्यांची रुची वाढली आणि डॉ. माणिक भगत यांच्याकडे त्यांनी पियानोचे रीतसर प्रशिक्षण घेतले. एका कच्छी व्यावसायिक कुटुंबात जन्मलेले वनराज १९४९मध्ये एलफिन्स्टन कॉलेजमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर त्यांच्या संगीतातील वाटचालीला एक वेग प्राप्त झाला. लंडनला हॉवर्ड फर्ग्युसन, अॅलन बुश, विल्यम ऑल्विन यांच्यासह त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले आणि त्यावेळी त्यांना सर मायकेल कोस्टा शिष्यवृत्ती मिळाली. १९५४ला त्यांनी सुवर्णपदकासह पदवी मिळविली.
हे ही वाचा:
अत्यावश्यक सेवेपलीकडील लोकांना नोंदणीशिवाय लस नाही!
“पवार साहेबांचे अदृश्य हात, अजित पवारांचे चोख नियोजन”
‘विरूष्का’कडून कोरोनाबाधितांना दोन कोटींची मदत
उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत घुसमट होते- संजय काकडे
भारतात ते १९५९ला आले आणि जाहिरातींसाठी जिंगल्स तयार करू लागले. असे काम करणारे ते भारतातील पहिले व्यक्ती होते. ७ हजार जिंगल्स त्यांनी जाहिरात विश्वासाठी रचल्या. लिरील, गार्डन वरेली, ड्युलक्सच्या जिंगल्स अजूनही आपल्या कानात रुंजी घालतात.
त्यांची पहिली फिल्म होती श्याम बेनेगल यांची अंकुर (१९७४). त्यानंतर बेनेगल यांच्या जवळपास सगळ्या चित्रपटांत त्यांचेच संगीत होते. भारतातील समांतर चित्रपटांतील त्यांचे संगीत विशेष गाजले. गोविंद निहलानींची तमस मालिका, कुंदन शहा यांची जाने भी दो यारो, अपर्णा सेन यांची ३६ चौरंगी लेन, सईद अख्तर मिर्झा यांची मोहन जोशी हाजीर हो, विधु विनोद चोप्रा यांची खामोश, विजया मेहता यांची पेस्तनजी या चित्रपटांतील त्यांचे संगीत लक्षणीय ठरले. पार्श्वसंगीतात त्यांचा हातखंडा होता. १९६३च्या हाऊसहोल्डरनंतर अजूबा, बेखुदी, परदेस, बेटा, दामिनी, चमत्कार, बंदिश, घातक, चायना गेट, चमेली, हिमाल पुत्र आदि चित्रपटांचे पार्श्वसंगीत त्यांचे होते. अमोल पालेकर यांच्या बनगरवाडी तसेच कथा दोन गणपतरावांची या चित्रपटांनाही अनुक्रमे त्यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले. त्याचवेळी खानदान, कथा सागर, यात्रा, तमस, भारत एक खोज, वागले की दुनिया, लाइफलाइन, बैंगन राजा, बायबल की कहानियाँ, बनेगी अपनी बात, नकाब अशा टीव्ही मालिकांचे संगीत लोकप्रिय ठरले. अनेक माहितीपटांनाही त्यांच्या संगीताचा साज होता. नाटयमंचावरही त्यांच्या संगीताचा वेगळा बाज पाहायला मिळाला. तुघलक, अंधा युग, तीन टक्के का स्वांग, ऑथेल्लो, निशीत या नाट्यकृतींना त्यांचे संगीत लाभले होते.
त्यांच्या या अफाट सांगितीक कार्याची दखल घेताना त्यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. तमससाठी सर्वोत्तम संगीतकार म्हणून त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संगीत नाटक अकादमीचाही पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पुरस्काराने त्यांना १९९०मध्ये गौरविण्यात आले. आपल्या अखेरच्या काळात आर्थिक विवंचनेमुळे एवढ्या मोठ्या संगीतकाराची मोठी अवहेलना झाली. संगीतक्षेत्रातील काही लोकांनी पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. अखेरच्या काळात ते अंथरुणाला खिळून होते. ७ मे रोजी त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांनी दिलेला हा सांगीतिक वारसा जपण्याचे आव्हान संगीतक्षेत्रासमोर असेल.