लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिकेचा निर्णय
मुंबईमध्ये सध्या लसीकरणासाठी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुरूवारपासून महानगरपालिकेने ‘वॉक इन’ लसीकरण बंद केले आहे. त्यामुळे यापुढे लसीकरणासाठी कोविन ॲपवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. बिगर नावनोंदणी येणाऱ्यास कोणत्याही प्रकारे लस दिली जाणार नाही.
मुंबई महानगरपालिकेने नावनोंदणीशिवायचे लसीकरण बंद केले आहे. त्यामुळे नोंदणी केली नसेल तर लस मिळणार नाही. यात काहींना सुट देण्यात आली आहे. ज्या ४५ वर्षांवरील नागरिकांचा लसीचा पहिला डोस झाला आहे त्यांना कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोस करता पुन्हा नोंदणी करणाची गरज पडणार नाही. त्यासाठी थेट लसीकरण केंद्रावर जाता येणार आहे. मात्र त्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे. यासोबतच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांना देखील ही सुविधा उपलब्ध आहे. हे प्रमाणपत्र छापील किंवा सॉफ्ट कॉपीच्या रुपाने देखील दाखवता येणार आहे.
हे ही वाचा:
मोदींनी पुन्हा घेतली कोरोनाची आढावा बैठक
लसीच्या दुसऱ्या डोसला विलंब होतोय?……चिंता नसावी!!
शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर
बांद्र- कुर्ला संकुलातील लसीकरण केंद्रात झालेला गोंधळ आणि तेथे लोकांनी केलेल्या कोविड नियमांचा भंग यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे कळले आहे. सध्या मुंबईत एकूण १४७ लसीकरण केंद्रे आहेत. या प्रत्येक केंद्रावर येणाऱ्या नागरिकाला प्रवेश देण्यापूर्वी नोंदणी केल्याचे दाखवावे लागणार आहे.
मात्र यामुळे ज्यांना नोंदणी करण्यात यापूर्वी अडचणी आल्या आहेत, त्यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही लोकांच्या मते हा निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नावनोंदणीसाठी सहाय्य करण्याची योजना तयार केली पाहिजे.
लसींच्या दोन डोसेस मधील अंतर वाढवण्याचा तज्ञांचा विचार
भारताच्या लसीकरणाची मदार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींवर आहे. त्यापैकी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा तज्ञांकडून विचार चालला आहे. यामुळे गर्दी आवरण्यास देखील सहाय्य होणार आहे. त्याशिवाय दोन डोस मधील अंतर काही प्रमाणात वाढवल्यास लसीची परिणामकारकता देखील वाढलेली आढळल्याचे काही संशोधनांतून समोर येत आहे.