भाजपाचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान केलं आहे. मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं मोठं विधान संजय काकडे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मोठं विधान केलं आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत, असं संजय काकडे म्हणाले. शिवसेना गेली २५ वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही ते म्हणाले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या घपल्याचा ‘मनोरा’ ३०० कोटींचा
मोदींनी पुन्हा घेतली कोरोनाची आढावा बैठक
मुंबईत लवकरच १४ ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु
दरम्यान, संजय काकडे यांची भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी आज हे मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.