25 C
Mumbai
Friday, January 17, 2025
घरसंपादकीयमुंडे यांच्या गच्छंतिचे दोन संकेत...

मुंडे यांच्या गच्छंतिचे दोन संकेत…

Google News Follow

Related

वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, या मागणीने जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांच्या आमदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्यामुळे राजीनामा देणार नाही, असे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. परंतु त्यांना जावे लागेल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

महायुतीचे सरकार सत्तेवर आल्या आल्या संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले. बीडमधील ज्या बाहुबलींच्या टोळीचे या हत्या प्रकरणात नाव घेतले जात आहे, ती टोळी गेल्या दोन दशकांत मातली. यातले बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. अजित पवार यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी बीड कार्यकारीणीच बरखास्त केली. याचा अर्थ कोणालाच या प्रकरणाचे शिंतोडे पक्षावर उडू नये असे वाटते आहे. अजित पवारांची ही कारवाई सुचक आहे आणि हे मुंडे यांच्यासाठी संकेतही आहेत.

महायुती सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांचा खास माणूस असलेल्या वाल्मिक कराडवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली आहे. या दरम्यान मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची मंगळवारी रात्री भेट घेतली. त्यानंतर ते रातोरात परळीला रवाना झाले. कराडला मकोका लावल्यानंतर परळीत आंदोलनांना ऊत आला आहे. ही परिस्थिती शांत करण्यासाठी मुंडे परळीत रवाना झाले असे सांगण्यात येत असले तरी ते खरे नाही. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार होते. महायुतीच्या आमदारांशी ते चर्चा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पंतप्रधानांसोबत असलेल्या बैठकीत फिरकू नका, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळेच ते रातोरात परळी शांत करण्याच्या नावाखाली मुंबईबाहेर रवाना झाले.

संतोष देशमुख यांची हत्या केली जात असताना आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचे वाल्मिक कराडसोबत अनेक फोन कॉल झाले. हा तपशील पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेला आहे. केवळ याच आधारावर कराडवर मकोका लावला काय, असा सवाल जेव्हा पोलिसांना करण्यात आला तेव्हा, कराडच्या गुन्हेगारीची कुंडलीच न्यायालयासमोर मांडण्यात आली. कराडच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत, त्यांच्या संपत्तीचे आकडे तर डोळे पांढरे करणारे आहेत. त्यामुळे तो लवकर बाहेर येण्याची शक्यता कमी आहे. हा पैसा काही घामाचा नाही. तो लुटीचा पैसा आहे. कराड आपला जवळचा माणूस आहे, असे मुंडे यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे या जवळच्या माणसाकडे इतका पैसा कसा आला, याचे उत्तर त्यांना माहीत असण्याची शक्यता आहे.

सरकारी कंत्राटांतून कमावलेल्या पैशाचा कराडच्या संपत्तीत निश्चितपणे वाटा आहे. ही कंत्राटे मिळवून देण्याची ताकद बीडमध्ये फक्त कराडकडे होती. प्रति धनंजय मुंडे म्हणून तो बीडमध्ये वावरायचा. २०२२ मध्ये त्याला ईडीची नोटीस आली होती, असा दावा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. प्रत्यक्षात ती चौकशी आता सुरू व्हायला हरकत नाही. आयकर विभाग, ईडी अशा सगळ्यांनी कराडवर कारवाई करावी, असे हे प्रकरण आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजून कराडचे नाव पोलिसांनी घेतले नसले तरी हे प्रकरण त्याच दिशेने जाताना दिसते आहे. कराडला ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्यात बऱ्याच खळबळ जनक माहिती बाहेर येऊ शकेल. या प्रकरणामुळे महायुती सरकारवर शिंतोडे उडू नये याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल. सुरेश धस यांनी सुरूवातीपासून हे प्रकरण लावून धरले आहे. ते मुंडे यांना टार्गेट करतायत, ही बाब लपून राहीलेली नाही. धस जाहीरपणे सांगतायत की आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूर्ण पाठींबा आहे. मुंडे यांच्याविरोधात सातत्याने बोलून सुद्धा जर धस यांना कोणी रोखत नसेल तर त्याचा उर्थ उघड आहे. फडणवीस खरोखरच त्यांच्या पाठीशी आहेत.

हे ही वाचा : 

भाजपाने दिल्लीत ७० पैकी ६८ जागी दिले उमेदवार

इंदिरा गांधी महान नेत्या, पण आमच्यासाठी त्याकाळी खलनायक!

सैफ अली खानवर हल्ला प्रकरण : केजरीवाल बरसले

जादूटोणा आरोपावरून दिलेली फाशीची शिक्षा ओरिसा कोर्टाने रद्द केली

पंतप्रधान मुंबईत असताना मुंडे यांना दूर ठेवले गेले ही बाब खूप बोलकी आहे. महायुतीच्या आमदारांसोबत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे अनेक आमदार गैरहजर होते. त्यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदींचा समावेश होता. परंतु यापैकी कुणालाही त्या चर्चेत येऊ नका, असा निरोप नव्हता. मुंडे यांच्याबाबत तसे म्हणता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदारामुळेच ही बाब उघड झाली. या बैठकीला छगन भुजबळ का नव्हते, दिलीप वळसे का नव्हते याबाबत कुणीही खुलासा केला नाही, मात्र मुंडे यांच्याबाबत तसा खुलासा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तो केला. याला म्हणतात, चोर के दाढी मे तिनका. त्या चर्चेत मुंडे यांचे नसणे हा एक मोठा संकेत आहे. महायुती मंत्रिमंडळातील त्यांचे काही दिवस शिल्लक आहेत. मविआच्या काळात झालेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याबाबती उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक फडणवीस निश्चितपणे करणार नाहीत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा