सोमवारी (१३ जानेवारी) पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा महाकुंभ मेळावा सुरू झाला आहे. देशातील कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराजला रवाना होत असून जगभरातील अनेक विदेशी नागरिकांनाही भारतात होणाऱ्या या अध्यात्मिक मेळाव्याचे आकर्षण आहे. त्यामुळे जगभरातून भाविक महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत. यातील काही भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
एएनआयशी बोलताना युरोपमध्ये काम करणाऱ्या एका रशियन भाविकाने सांगितले की, “आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुंभ मेळ्यात आलो आहोत. त्यामुळे आम्ही खूप उत्साही आहोत. येथे तुम्हाला खरा भारत दिसतो आणि भारताची खरी शक्ती ही त्यांचे लोक आहेत. हे अत्यंत पवित्र स्थान आहे आणि मला भारत आवडतो. ‘मेरा भारत महान!’ असा जयघोष करत त्यांनी महाकुंभ मेळाव्यासह भारताचे कौतुक केले.
आणखी एक भक्त जे सात वर्षांपासून सनातन धर्माचे पालन करत आहेत असे जेरेमी म्हणाले की, “गंगा माता, यमुना माता यांना पाहणे खूप सुंदर आहे. इथे श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही आणि तेचं सुंदर आहे.” प्रथमच भारत भेटीवर आलेले जोनाथन म्हणाले की, भारतातील त्यांचा अनुभव उत्कृष्ट आहे. इथले लोक खूप सुंदर आहेत. इथले जेवण आणि इतरही बरेच काही सुंदर आहे. तीर्थक्षेत्रे आणि पवित्र स्थळे, मंदिरे पाहून आश्चर्यकारक वाटले. आम्ही शाही स्नान घेण्यासाठी उत्सुक असून हे रोमांचक आहे.
हे ही वाचा..
आप आमदार मोहिंदर गोयल यांची आज पोलीस चौकशी
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पाच नक्षलवाद्यांना यमसदनास धाडले; शस्त्रे केली जप्त!
प्रतितास दोन लाख भाविक अमृत स्नान करणार; संगम त्रिवेणी क्षेत्रात वाढ
वानखेडे स्टेडियमवर मी माझे पहिले द्विशतक ठोकले !
जगभरातून भाविक प्रयागराजला येत आहेत. यापूर्वी दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि स्पेनमधील यात्रेकरूंनी एएनआयला सांगितले की ते येथे येऊन स्वतःला धन्य आणि खूप भाग्यवान समजत आहेत. “इथे सर्व छान आहे. भारत हे जगाचे आध्यात्मिक हृदय आहे. पाणी थंड असलं तरी मन उबदार आहे, असं ब्राझीलचे भक्त फ्रान्सिस्को यांनी म्हटले आहे. या वर्षी, महाकुंभाचे आणखी महत्त्व आहे कारण हा महाकुंभ १४४ वर्षांत केवळ एकदाच घडणाऱ्या दुर्मिळ खगोलीय संरेखनादरम्यान येतो. १२ वर्षांनंतर महाकुंभ साजरा होत असून या कार्यक्रमासाठी ४५ कोटींहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा आहे. २६ फेब्रुवारीला महाकुंभाचा समारोप होणार आहे.