एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे वादग्रस्त पोलिस अधिकारी दया नायक यांची दहशतवाद विरोधी पथकातून बदली करण्यात आल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. नेहमीच वादग्रस्त राहिलेले दया नायक यांची आता गोंदियाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या उपसंचालकपदी बदली करण्यात आली आहे. ही बदली प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी यामागील नेमके कारण काय, हे स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा :
शिवसेना नेत्याचा ‘बड्डे’, कोविड नियमावलीचे तीन तेरा
अनिल देशमुखांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक
देशातील कोविडचे एक उत्परिवर्तन लवकरच नष्ट होण्याची शक्यता
दया नायक हे महाराष्ट्र पोलिसमध्ये १९९५मध्ये सेवेत आले आणि त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून लवकरच नावारूपाला आले. त्यांचे तत्कालिन वरिष्ठ अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याबरोबरच गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी अंडरवर्ल्डमधील नामचीन गुंडांचे एन्काऊंटर करण्यास सुरुवात केली. १९९६मध्ये त्यांनी पहिला एन्काऊंटर केल्याचे बोलले जाते. २००६मध्ये त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांचे निलंबन करण्यात आले. बेहिशेबी मालमत्तेचे प्रकरण त्यांच्यावर शेकले होते. त्यानंतर लाचलुचपत विभागाकडून त्यांना अटकही झाली होती. २०१२मध्ये ते पुन्हा सेवेत रुजू झाले. पण २०१४मध्ये त्यांच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर २०१६मध्ये त्यांना दहशतवाद विरोधी पथकात घेण्यात आले. पण आता त्यांची बदली करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यात सचिन वाझे, प्रदीप शर्मा आदि नावांची बरीच चर्चा सुरू आहे. वाझे, शर्मा आणि नायक हे तिघेही एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. तिघेही वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे नायक यांच्या बदलीमागे नेमके काय कारण आहे, याबद्दल उत्सुकता ताणली जात आहे.