दिल्लीतून १२ वीच्या विद्यार्थ्याने शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ईमेलद्वारे दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी १२ वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील विविध २३ शाळांना बॉम्बची धमकी देणारे ईमेल या विद्यार्थ्याने पाठवले होते. चौकशीत त्याने कबुल केले आहे. बॉम्बची धमकी दिलेल्या यादीत दिल्ली पब्लिक स्कूल, ब्लू बेल्स आणि वसंत विहारमधील टागोर इंटरनॅशनल आणि आरके पुरम शाळेंचा समावेश आहे.
हे ही वाचा :
हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल राहणार उपस्थित
मुस्लिमांना महाकुंभात येऊन दुकान मांडता येईल का?
वणवा घरापर्यंत पोहोचला, पण आपले घर त्यांनी सोडले नाही!
महाकुंभ मेळाव्यानिमित्त आकाशवाणीकडून ‘कुंभवाणी’
विद्यार्थ्याला शाळेत परीक्षेला बसायचे नसल्यामुळेच त्याने हे मेल पाठवल्याचे तपासादरम्यान समोर आले. दक्षिण दिल्ली पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून या विद्यार्थ्याने हे स्वत:च्या इच्छेने केले की कोणाच्या सांगण्यावरून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
दिल्लीच्या शाळा आणि महाविद्यालयांना गेल्या काही महिन्यांपासून अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत, ज्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. तथापि, आतापर्यंत हे मेल फसवे असल्याचे आढळून आले आहे. गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांनी सांगितले की नोव्हेंबरमध्ये वेंकटेश्वर ग्लोबल स्कूलला बॉम्बची धमकीत्यांच्याच विद्यार्थ्यांनी पाठवली होती. दोन भावंडांनी हा धमकीचा मेल पाठवला होता, कारण त्यांना परीक्षा पुढे ढकलण्याची इच्छा होती.