दिल्ली विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे, असे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी (८ जानेवारी) सांगितले. तृणमूल काँग्रेसने पाठींबा दिल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आणि म्हटले, “धन्यवाद दीदी”.
माजी मुख्यमंत्री ट्वीटरवर एका पोस्टमध्ये म्हणाले, “टीएमसीने दिल्ली निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मी वैयक्तिकरित्या ममता दीदींचा आभारी आहे. धन्यवाद दीदी. आमच्या चांगल्या आणि वाईट काळात तुम्ही नेहमीच आम्हाला साथ दिली आणि आशीर्वाद दिला, असे केजरीवाल यांनी म्हटले. याआधी समाजवादी पक्ष आणि शिवसेना (उबाठा) नेही केजरीवाल यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
आप पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी उत्सुक असून भाजपा दिल्लीमध्ये सरकार स्थापन करण्यास जोर लावत आहे. तर, काँग्रेसही आपली प्रतिष्ठा जपण्याच्या प्रयत्नात असणार आहे. लोकसभेमध्ये इंडी आघाडीच्या माध्यमातून आप आणि काँग्रेस एकत्र लढले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत आपने सुरुवातीलाचं एकला चलो चा नारा दिला आहे.
हे ही वाचा :
कंगना राणौत यांनी प्रियंका वाड्रांना ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहण्यासाठी केले आमंत्रित!
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त!