राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे जनतेला कोवीड नियमावली पाळायचे आवाहन करत असतानाच, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांच्या या म्हणण्याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादमधील शिवसेनेचे नेते आणि औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या वाढदिवसाच्या जंगी सोहळ्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. यात राज्यातील सर्व कोविड निर्बंध धाब्यावर बसवून घोडेले यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते असणाऱ्या घोडेलेंवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
देशभर सध्या कोविडची दुसरी लाट सुरु आहे. कोविडच्या या लाटेत महाराष्ट्र सगळ्यात जास्त होरपळून निघत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सरकारने राज्यात लॉकडाऊन लावलेला आहे. सध्या स्थितीला १५ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन असणार आहे.
हे ही वाचा
मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य
७ किलो युरेनियमसह दोघांना अटक, एटीएसची कारवाई
बंगालमधल्या हिंसाराबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाचे पथक बंगालमध्ये दाखल
सत्ताधारी पक्ष ते प्रमुख विरोधी पक्षही नाही, काँग्रेसची अधोगती सुरूच…
पण राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन सत्ताधारी शिवसेनेच्याच नेत्यांकडून होताना दिसत आहे. शिवसेनेचे औरंगाबादमधील नेते नंदकुमार घोडेले यांचा ४ मे रोजी वाढदिवस झाला. यावेळी घोडेले यांच्याकडून वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. ढोल-ताशे वाजवत, फटाक्यांच्या माळा फोडत गर्दी जमवून घोडेलेंनी वाढदिवस दणक्यात साजरा केला. यात लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सगळे सहभागी झाले होते. यावेळी ना सामाजिक अंतर पाळण्यात आले, तर काहींच्या तोंडावर मस्कसुद्धा नव्हते.
त्यामुळे घोडेले यांच्या या बेजबाबदार वागण्यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संबंधीचे वृत्त दिले आहे.