25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरसंपादकीयफडणवीसांचे मुख्यमंत्रीपद अवघ्या चार महिन्यात इतिहासजमा होणार?

फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद अवघ्या चार महिन्यात इतिहासजमा होणार?

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुतीला जनतेने उदंड यश दिले. गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्रीपदी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी महायुती २०० चा आकडा सहज ओलांडेल, असा विश्वास व्यक्त केला होता. तो महाराष्ट्राच्या जनतेने सार्थ ठरवला. महायुतीला असे ऐतिहासिक यश मिळाल्यानंतरही हे सरकार केवळ चार महिने टिकणार आहे. फडणवीस फक्त चार महिने मुख्यमंत्री पदावर राहणार आहेत. गेली काही दशके मराठी चाय- बिस्कुट मीडियाने ज्यांची प्रतिमा तेल लावलेला पैलवान, वस्ताद, वगैरे वगैरे रुपात रंगवलेली आहे ते शरद पवार पुन्हा काही जबरदस्त खेळी करणार आहेत का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. पवारांचा एक अदनासा, बारीकसा, अडगळीत पडलेला एक मोहरा ही क्रांती घडवणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ईव्हीएमच्या मुद्द्याचे नेमके काय करायचे याबाबत एकमत होताना दिसत नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कन्यारत्न म्हणजेच संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी ‘मी चार वेळा याच ईव्हीएमवर जिंकून आले, हाती काही पुरावा नसताना मी कसे बोलू, असे विधान करून तलवार म्यान केली’, त्याला फार दिवस झालेले नाहीत. तो पर्यंत उत्तम जानकर महाराष्ट्रातील २८८ मतदार संघांचा एक्झिट घेऊन मोकळे झालेत.

जानकर हे माळशिरसचे आमदार आणि सध्या चर्चेत असलेल्या माळशिरस पॅटर्नचे जनक आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपले शिक्षण कला शाखेचे पदवीधर असे दिले आहे. अकलूजच्या शंकरराव मोहीते पाटील कॉलेजमधून त्यांनी ही पदवी घेतल्याची आमची माहिती होती. परंतु प्रतिज्ञापत्रातील ही माहिती अर्धवट किंवा चुकीची असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जानकर यांचे ‘गंगाधर’ वाटत असले तरी ते ‘शक्तिमान’च आहेत, हे त्यांचा ताजा दावाच सांगतो आहे. महाराष्ट्राचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या काळात जानकर यांनी ज्या तडफेने खरे निकाल बाहेर काढलेले ते पाहाता त्यांनी एक तर आयआयटी किंवा आयआयएममधून शिक्षण घेतले आहे, किंवा त्यांना कर्ण पिशाच्छ तरी वश झालेले आहे. महायुतीला मिळालेल्या एकूण २३० जागांपैकी १५० जागा त्यांना मिळालेल्याच नाहीत. उपमुख्यमंत्री पदावर असलेले अजित पवारही हरलेत. मुळात हे लोकांनी निवडून दिलेले सरकारच नाही आणि त्यामुळे हे सरकार अवघ्या चार महीन्यात जमीनदोस्त होणार आहे. हा जानकरांच्या तांत्रिक अभ्यासातून काढलेला निष्कर्ष.

प्रत्येक मतदार संघाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून ते या अनुमानाप्रत आलेले आहेत. म्हणूनच ते बीए पास नसून आयआयटी किंवा आयआयएममधून शिकले असावे, केवळ विनम्रपणा म्हणून स्वतःला बीए पास म्हणत असावे, असा दाट संशय येतोय. देशातील पहिला ओपिनियन पोल प्रणब रॉय यांनी केला होता. तो बऱ्यापैकी अचूक ठरला होता. त्यानंतर काही चतुर मेंदूंनी एक्झिट पोलचा शोध लावला. अलिकडे सगळ्याच पोलचा बाजार उठलेला असताना मार्केटमध्ये एक नवा टायगर आलेला आहे. त्याचे नाव उत्तम जानकर आहे. चेहरा हा फसवा असतो. चेहऱ्यावर जानकर यांच्या विद्वत्तेचे तेज अजिबात जाणवणार नाही. त्यांच्या शब्दांतूनही ते कळणार नाही. परंतु, ते विद्वान आहेत. महाराष्ट्राच्या निकालांचा तांत्रिक अभ्यास करून त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेले आहे. जणू प्रणब रॉय यांनी जानकर यांच्यात जिवंतपणी पर कायाप्रवेश केलेला आहे.

चार महिन्यात हे सरकार जाणार, असा दावा जानकर करतायत. माहिती एकत्र करणे, त्याचे विश्लेषण करणे यासाठीच्या तज्ज्ञतेसाठी आवश्कयत कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना जानकर हा दावा करतायत. आणि चाय-बिस्कूट मीडिया हा दावा स्फोटक असल्याचे जाहीर करून मोकळा झाला आहे. कोणाही सोम्यागोम्याच्या फुसकूल्या जर यांना स्फोटक वाटतात कारण, स्फोटक बातम्या काढण्याची पत्रकारांची ताकद संपलेली आहे. जानकर यांना खरे तर मराठी चाय बिस्कूट मीडियाने निवडणूक आयोगाचा दर्जा द्यायलाही हरकत नाही. मराठी मीडियाची गेल्या काही वर्षांतील वाटचाल पाहता हे अगदीच अशक्य नाही. या मीडियाचे आँखो के तारे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना जर २०१४ पासून सत्तेवर आलेले सरकार हे मोसाद आणि सीआयएचे संयुक्त षडयंत्र वाटू शकते तर जानकर यांचे ताजे साक्षात्कार अगदीच फिके म्हणायला हवे.

हे ही वाचा : 

केजरीवालांकडून आता पुजाऱ्यांना साद; दरमहा मिळणार १८,००० रुपये

केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान!

संतापजनक! बांगलादेशात नमाजावेळी त्रास झाल्याने श्वानाला फासावर लटकवले!

बेकायदेशीर बांगलादेशींचा पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला

एका महिन्याच्या काळात आपण महाराष्ट्रातील २८८ मतदार संघांचा तांत्रिक अभ्यास कसा केलात? ते तंत्र तुम्ही कुठून अवगत केलेत? किती जणांनी महाराष्ट्रातील मतदार संघांचा आढावा घेतला? आढावा घेणारे राष्ट्रवादी शपचे पदाधिकारी होते की काही तांत्रिक शिक्षण घेतलेले लोक होते? असे प्रश्न विचारण्याच्या भानगडीत मीडिया पडत नाही. कोण उगाच मेंदूला शीण देईल. त्यापेक्षा जानकरांना प्रणब रॉय बनवणे आणि ते सांगतात ते ऐकून माना डोलावणे, सोपे असते. जानकर यांच्या तांत्रिक सर्व्हेने सुप्रिया सुळेंना अगदी तोंडावर पाडले. चार वेळा खासदार राहिलेल्या संसदरत्न बाई ईव्हीएमबाबत काही पुरावे हाती येई पर्यंत बोलणार नाही, असे विधान करतायत. जानकर मात्र दे धडक, बेधडक चार महिन्यात सरकार पाडण्याचा दावा करतायत. सुप्रिया सुळे, नाना पटोले किंवा उद्धव ठाकरे या सर्वांना निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत होती. महाराष्ट्राच्या जनतेने या स्वप्नांचा चक्काचूर केला. जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या अगदी विपरीत मत व्यक्त केलेले असले तरी हे खयाली पुलाव सुळे बाईंना आनंद देणारेच आहेत. सरकार पाडण्याची पहिली तारीख जाहीर करून जानकर यांनी नकळत संजय राऊतांच्या पावलावर पाऊल टाकले आहे, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा