भारताच्या सांस्कृतिक मूल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी गेले एक तप हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या हिंदू आध्यात्मिक सेवा मेळाव्याचे आयोजन नव्या वर्षात ९ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबईत होत आहे. भारताच्या सांस्कृतिक उत्थानासाठी अशा मेळाव्यांचे गेली १२ वर्षे अथक आयोजन होत आहे. जनमानसापर्यंत संस्कार, भारतीय मूलतत्त्वे, जीवनमूल्ये पोहोचावीत या उद्देशाने या मेळाव्यांचे देशभरात आयोजन केले जाते. नव्या वर्षात मुंबईत हा मेळावा होत आहे. ‘मूल्यवर्धन म्हणजे राष्ट्रनिर्माण’ असे या उपक्रमाचे बोधवाक्य आहे. ‘न्यूज डंका’ या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.
या मेळाव्याचे सचिव अमरनाथ शर्मा यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर सांगितले. ते म्हणाले की, गेली १२ वर्षे असे मेळावे देशभरातील विविध शहरात भरविण्यात येत आहेत. जवळपास ४० मेळावे आतापर्यंत भरविण्यात आले असून त्यातून देशभरात एक सांस्कृतिक बदल घडविण्याच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ९ जानेवारीपासून पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगूरनगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव येथे मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. १२ जानेवारीपर्यंत हा मेळावा सुरू राहील.
हे ही वाचा:
भारतविरोधी दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता
सुप्रिया ताई गोवारी हत्याकांड विसरलात का?
“पूर्वीच्या बीडच्या पालकमंत्र्यांनी त्यांचे पालकमंत्री पद भाड्याने दिले होते”
बँक लुटणारे दोन आरोपी चकमकीत ठार!
सहा प्रमुख उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून हा मेळावा घेण्यात आला आहे. जंगलांचे रक्षण आणि वन्यजीवांची सुरक्षितता, निसर्ग आणि वन्यजीव यांचे जतन, पर्यावरणाची चिंता, परिवार आणि मानवी मूल्यांचे महत्त्व, महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मान, देशभक्तीचा उद्घोष या उद्दिष्टांची पूर्ती या मेळाव्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या मेळाव्याच्या उद्घाटनाला अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे खजिनदार श्री गोविंदगिरी महाराज येणार आहेत, असेही अमरनाथ शर्मा यांनी सांगितले.
९ जानेवारीपासून आयोजित केल्या जाणाऱ्या या मेळाव्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. परमवीर वंदन, गंगा आरती, आचार्य वंदन, युवा संमेलन, साधना, कन्या पूजन, सामाजिक समरसता संमेलन, मातृपितृ वंदन, श्री भक्तांबर स्तोत्र, शौर्य प्रदर्शन अशा कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.
यासंदर्भातील माहिती www.mumbai.hssf.co.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.