आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती म्हणजेच आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन हे हायब्रिड मॉडेलनेच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान यंदा पाकिस्तानकडे असून बीसीसीआयने भारतीय संघाला सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला होता. यावर पाकिस्तान बोर्डने आक्षेपही घेतला होता. मात्र, आयसीसीने बीसीसीआयची मागणी मान्य करत भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याचं जाहीर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा दणका दिला आहे. यानंतर आता पुढील वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खेळवली जाईल. आयसीसीने आधीच स्पष्ट केले होते की ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार आहे. यामध्ये भारत आपले सामने अन्य देशात खेळणार आहे. पाकिस्तान आणि युएईमध्ये १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान सामने रंगणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आठ संघांमध्ये एकूण १५ सामने होणार आहेत. संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच ‘गट-अ’ मध्ये आहेत. तर न्यूझीलंड आणि बांगलादेश संघ त्याच गटात आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांचा ‘ब गट’ असणार आहे.
या हायब्रीड मॉडेल अंतर्गत, पाकिस्तान १० सामन्यांचे आयोजन करेल, तर भारताचे तीन लीग-स्टेज सामने, ज्यात पाकिस्तान विरुद्ध लढतीचा समावेश आहे ते दुबईमध्ये होतील. भारताने अंतिम फेरी गाठल्यास उपांत्य फेरीतील एक आणि अंतिम सामनाही दुबईत खेळवला जाईल. मात्र, भारत साखळी फेरीनंतर स्पर्धेतून बाहेर पडल्यास, हे सामने पाकिस्तानातील लाहोर आणि रावळपिंडी येथे होतील.
हे ही वाचा :
भारतविरोधी दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता
मुलांना ‘सांताक्लॉज’ बनवण्यापूर्वी पालकांची परवानगी अनिवार्य अन्यथा होणार कारवाई!
हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील
“पूर्वीच्या बीडच्या पालकमंत्र्यांनी त्यांचे पालकमंत्री पद भाड्याने दिले होते”
भारत आणि ऑस्ट्रेलियाने दोन- दोन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा हंगाम झाला होता, जेव्हा पाकिस्तानने अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला हंगाम १९९८ मध्ये झाला. तेव्हापासून आतापर्यंत आठ हंगाम आले आहेत. भारतीय संघाने २००२ मध्ये पहिल्यांदा श्रीलंकेसोबत संयुक्तपणे हे विजेतेपद पटकावले होते. यानंतर २०१३ मध्ये दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. याशिवाय दक्षिण आफ्रिका (१९९८), न्यूझीलंड (२०००), वेस्ट इंडीज (२००४), ऑस्ट्रेलिया (२००६, २००९) आणि पाकिस्तान (२०१७) यांनी विजेतेपद पटकावले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक
सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होतील
- १९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
- २० फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
- २१ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
- २२ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
- २३ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
- २४ फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
- २५ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
- २६ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
- २७ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
- २८ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
- १ मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
- २ मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
- ४ मार्च – उपांत्य फेरी १, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई*
- ५ मार्च – उपांत्य फेरी २, गद्दाफी स्टेडियम, लाहोर**
- ९ मार्च – फायनल – गद्दाफी स्टेडियम, लाहोर***
*उपांत्यपूर्व १ मध्ये भारत पात्र ठरला तर सामील होईल
**पाकिस्तान पात्र ठरल्यास उपांत्य फेरी २ मध्ये सामील होईल
***जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जाईल