दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले असून राजधानीमध्ये दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या बेकायदेशीर इमिग्रेशन रॅकेटचा पर्दाफार्श केला आहे. तसेच या प्रकरणी ११ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बनावट वेबसाइट तयार करणे, बनावट कागदपत्रे आणि बनावट आधार कार्ड बनवणे अशी कामे करणारे आणि तंत्रज्ञान तज्ञांचा या अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलिस उपायुक्त (डीसीपी) दक्षिण अंकित चौहान यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट वेबसाइटद्वारे बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे तयार करून बांगलादेशी नागरिकांना मदत केली आहे. एएनआयशी बोलताना डीसीपी चौहान म्हणाले की, अवैध स्थलांतरितांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी जंगल मार्ग आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वापर केला आहे.
आत्तापर्यंत या प्रकरणात ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे लोक बांगलादेशी नागरिकांना बनावट वेबसाइटद्वारे बनावट आयडी वापरून सुविधा देत होते. आरोपींनी बनावट वेबसाइटद्वारे बनावट आधार, मतदार ओळखपत्र आणि बनावट ओळखपत्र वापरून तयार केलेल्या इतर कागदपत्रांचा वापर केला.
हे ही वाचा:
बीकेआय प्रतिबंधित दहशतवादी गटाला शस्त्र पुरवठा करणाऱ्याला मुंबईत ठोकल्या बेड्या
चित्रपटांसाठी १८ राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी असणारे श्याम बेनेगल यांची कारकीर्द कशी होती?
मुंबईतून ६ घुसखोर बांगलादेशीना अटक, निवडणुकीत झाले मतदान!
फडणवीस ‘बांबूंची लागवड’ करतील का?
दरम्यान, दिल्लीच्या उपराज्यपालांनी मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना दिल्लीत राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सांगितले आहे की, आतापर्यंत शहरात एक हजारहून अधिक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटली आहे. पोलिसांच्या या मोहिमेमध्ये संशयितांच्या घरोघरी जाऊन त्यांची पडताळणी, कागदपत्रांची छाननी आणि चौकशीचा याचा समावेश होता. ही मोहीम राबवण्यासाठी स्थानिक पोलिस आणि परदेशी सेल यांचा समावेश असलेली विशेष पथके तैनात करण्यात आली होती.