निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम बगेनल हे त्यांच्या दमदार चित्रपटांसाठी ओळखले जात होते. ‘मंथन’, ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘भूमिका’ अशा अनेक समांतर सिनेमांचे निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांची स्वतःची वेगळी ओळख आहे. मुंबई सेंटर येथील वोकार्ट हॉस्पिटलमध्ये श्याम बेनेगल यांची प्राणज्योत मालवली.
‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’ हे आणि असे अनेक दमदार चित्रपट त्यांनी दिले. समांतर सिनेमा दिग्दर्शित करण्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. ‘अंकुर’ या त्यांच्या पहिल्यावहिल्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच ‘निशांत’, ‘मंथन’, ‘जुनून’, ‘आरोहण’ या चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले आहेत. ‘महाभारत’ या संकल्पनेवर त्यांनी ‘कलयुग’ सिनेमा दिग्दर्शित केलेला. त्यांच्या चित्रपटांमधून अनंत नाग, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील या कलाकारांना ओळख मिळाली.
श्याम बेनेगल यांना त्यांच्या सिनेमांसाठी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळवले होते. त्यांना १९७६ मध्ये पद्मश्री आणि नंतर १९९१ मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर ते टीव्हीकडे वळले. १९८६ मध्ये त्यांनी ‘यात्रा’ नावाचा पहिला टीव्ही शो केला. ही प्रवासावर आधारित मालिका होता. भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्गावर धावणारी ट्रेन हिमसागर एक्स्प्रेसवर ही चित्रित करण्यात आली आहे. पुढे त्यांनी ‘कथा सागर’ नावाचा शो केला. यानंतर १९८८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित ‘भारत एक खोज’ ही मालिका आणली. ‘भारत एक खोज’ द्वारे भारताचा इतिहास दाखवल्यानंतर, २०१४ मध्ये, श्याम बेनेगल यांनी ‘संविधान’ नावाचा शो आणला. या शोमध्ये ‘संविधान’ बनवण्यामागील कथा दाखवण्यात आली होती.
हे ही वाचा:
मुंबईतून ६ घुसखोर बांगलादेशीना अटक, निवडणुकीत झाले मतदान!
आईला धडक देणाऱ्या कार चालकाची मुलांनी केली हत्या
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून आप सरकारच्या विरोधात ‘आरोप पत्र’ जारी
राहुल गांधी म्हणतात, सूर्यवंशी यांची हत्या दलित म्हणून…भातखळकर म्हणाले, ही तर गिधाडे!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही एक्सवर श्याम बेनेगल यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे. “श्याम बेनेगल यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ज्यांच्या कथाकथनाच्या कलेचा भारतीय चित्रपटसृष्टीवर खोलवर परिणाम झाला. विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कार्याचे नेहमीच कौतुक करतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्याप्रति संवेदना. ओम शांती.” अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत.
Deeply saddened by the passing of Shri Shyam Benegal Ji, whose storytelling had a profound impact on Indian cinema. His works will continue to be admired by people from different walks of life. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2024