दिल्लीत लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच भाजपाने सोमवार, २३ डिसेंबर रोजी दिल्लीत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात ‘आरोप पत्र’ जारी केले. यावेळी भाजप खासदार अनुराग ठाकूर, दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.
यावेळी अनुराग ठाकूर म्हणाले की, “हे तेच लोक आहेत ज्यांनी अण्णा हजारे यांना पुढे आणले, काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलने केली आणि नंतर स्वतःच भ्रष्टाचाराचे नवे मापदंड प्रस्थापित केले. त्यांनी दिल्लीतील शाळांना जागतिक दर्जाचे बनवण्याचे आश्वासन दिले होते, तरीही दोन लाखांहून अधिक विद्यार्थी अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांनी २४/७ स्वच्छ आणि मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आज हजारो कुटुंबांना पैसे खर्च करून टँकरमधून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यांनी दिल्लीत मोफत दवाखाने आणि मोठी रुग्णालये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आज ७० टक्के रुग्णांना एक्यूआय पातळी ओलांडल्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार घेणे भाग पडले आहे. त्यांनी दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांच्या पक्षातील आठ मंत्री, एक खासदार आणि १५ आमदार यापूर्वीच तुरुंगात गेले आहेत,” अशी घाणाघाती टीका अनुराग ठाकूर यांनी केली.
यमुना प्रदूषणावरून आप सरकारवर निशाणा साधताना अनुराग ठाकूर म्हणाले की, “पूर्वांचलमधील लोक यमुनेच्या तीरावर भक्तीभावाने छठपूजा आणि धार्मिक विधी करत असत पण केजरीवाल सरकारने यमुना इतकी प्रदूषित केली की आता हा उत्सव साजरा करणे बंद झाले आहे. दहा वर्षे झाली, यमुना स्वच्छ झाली आहे का? दिल्लीचा AQI ५०० च्या वर गेला, यमुना प्रचंड प्रदूषित आहे, धन्यवाद, केजरीवाल सरकार. त्या बदल्यात दिल्लीतील लोकांना पाण्याची मूलभूत सुविधाही उपलब्ध नाही. पंतप्रधानांचे जल जीवन मिशनने सर्वांना पाणी पुरवठा सुनिश्चित केले आहे, परंतु केजरीवाल यांनी ते येथे लागू होऊ दिले नाही,” असंही अनुराग ठाकूर म्हणाले.
“आम्हाला केजरीवालांच्या भ्रष्टाचार आणि प्रदूषणापासून दिल्लीला वाचवण्याची गरज आहे. मी केजरीवालांना यमुनेत डुंबण्याचे आवाहन करतो कारण २०२५ पर्यंत ती साफ केली नाही तर आम्ही त्यांना जबाबदार धरू,” असे खासदार ठाकूर म्हणाले.
हे ही वाचा :
आगरतळा रेल्वे स्थानकावर ३ बांगलादेशी घुसखोरांना अटक!
फडणवीस-भुजबळांची भेट, १०-१२ दिवसात तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर लिखित ‘गानसरस्वती आदिशक्तीचा धन्योद्गार!’चे शनिवारी प्रकाशन
ट्रम्प टीममधील AI साठी वरिष्ठ धोरण सल्लागारपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन कोण आहेत?
केजरीवाल सरकारमध्ये अनेक घोटाळे झाल्याचा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला. पाणी बोर्ड घोटाळा, क्लासरूम घोटाळा, मोहल्ला क्लिनिक घोटाळा, वक्फ बोर्ड घोटाळा, दारू घोटाळा, डीटीसी घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची यादी त्यांनी बोलून दाखवली. हे कसले सरकार आहे? आम्ही दिल्लीला वाचवण्यासाठी काम करू. भ्रष्ट आणि दिल्लीच्या गुन्हेगाराला आम्ही माफ करणार नाही, पण त्याने केलेला घोळ साफ करू. हे एकमेव सरकार आहे जिथे आरोग्य मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सर्व तुरुंगात होते. हे लोकांसाठीचे सरकार नव्हते तर तुरुंगातील सरकार होते, अशी खोचक टीका अनुराग ठाकूर यांनी केली आहे.