पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलिसांना मोठे यश मिळाले असून खलिस्तानी कमांडो फोर्सच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे झालेल्या चकमकीत पोलिसांनी खलिस्तानी कमांडो फोर्सच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांनी पंजाबमधील गुरुदासपूर येथील पोलीस चौकीवर ग्रेनेड आणि बॉम्ब फेकले होते. गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग आणि जसनप्रीत सिंग अशी चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.
पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलिस चौकीवर हल्ला करणाऱ्या तीन खलिस्तानी दहशतवाद्यांना उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात सोमवारी, २३ डिसेंबरच्या पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले. गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग आणि जसनप्रीत सिंग असे आरोपी खलिस्तान कमांडो फोर्स नावाच्या प्रतिबंधित संघटनेचे होते आणि पंजाब पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलीस यांच्या संयुक्त चकमकीत मारले गेले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन एके- 47 रायफल, दोन पिस्तूल आणि अनेक जिवंत राऊंडही जप्त केले आहेत.
पंजाब पोलिसांच्या एका पथकाने पिलीभीत पोलिसांना जिल्ह्यातील पुरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात तीन आरोपींच्या उपस्थितीची माहिती दिली, त्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. पुरणपूर येथे तीन जण संशयास्पद वस्तूंसह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडले आणि सोमवारी पहाटे झालेल्या चकमकीत तीन आरोपी मारले गेले.
हे ही वाचा:
पुण्यात डंपरने नऊ जणांना चिरडले; मद्यधुंद चालकाला केली अटक
ठाकरेंच्या अटी-शर्थींवर शिक्कामोर्तब… मात्र, जिंकले अदाणी
पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या काश्मिरी दहशतवाद्याला बंगालमध्ये अटक!
‘पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान’
“आव्हान मिळाल्यावर आरोपींनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ते ठार झाले. पंजाब पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केली. पंजाब पोलिसांच्या पथकाने आम्हाला त्यांचे परदेशी कनेक्शनही सांगितले. या संपूर्ण घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे,” असे पिलीभीत पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.